निलम नगरातील गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरास प्रतिसाद….
महापालिका आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन....

सोलापूर
हद्दवाढ भागातील दक्षिण पूर्व मंडळमधील निलम परिसरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली. त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी – विक्री झाली होती. शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्याने हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित झाल्याने हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे. या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्यातर्फे निलम नगरात हे शिबिर पार पडले. निलम नगर, आकाशवाणी केंद्र, स्वागत नगर परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब, श्रमिक, कामगारांची अधिक प्रमाणात आहे. सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंठेवारी नियमित करण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी डेप्युटी डायरेक्टर टाऊन प्लॅनिंग मनीष बिशनोईकर, शशी थोरात, अर्जुन जाधव, आनंद गदगे, सोमनाथ केंगनाळकर, बसू केंगनाळकर, योगेश कुरी आदी उपस्थित होते.
चौकट
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावाः देशमुख
शहरातील सर्वच हद्दवाढ भागात टप्प्याटप्यात गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांनी केले.