पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २५ पूर्णाकृती मूर्तींचे थाटात वितरण ….
ॲड. शंकर नरोटे मित्र परिवाराचा उपक्रम : भर पावसातही अहिल्यादेवी भक्तांची लक्षणीय उपस्थिती....

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ॲड. शंकर नरोटे मित्र परिवारातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २५ पूर्णाकृती मूर्तींचे रविवारी थाटात वितरण करण्यात आले. उपलप मंगल कार्यालयात मूर्ती वाटपाचा हा कार्यक्रम झाला.
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते जिल्हाभरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळांना मूर्तींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर , राजाभाऊ काकडे, श्रीराम पाटील बेलाटीकर , सिद्ध निशाणदार, प्रथमेश पाटील, मनिषा माने, सनी देवकते, संयोजक ॲड. शंकर नरोटे, समर्थ मोटे, युवराज जानकर, आदित्य फत्तेपुरकर, सोमनाथ मस्के, शशिकला कस्पटे, महेश गाडेकर, शेखर बंगाळे, आबा मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मूर्ती नेण्यासाठी आलेल्या विविध मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पिवळा फेटा बांधून तसेच पिवळा शेला देऊन स्वागत करण्यात येत होते. तसेच पारंपरिक धनगरी ढोलमुळे वातावरणात उत्साह भरला होता. याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर मंडळांना मूर्तींचे वाटप झाले.
आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, मूर्तीवाटप संकल्पना कौतुकास्पद आहे. यातून इतिहासाची शिकवण मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे विचार युवकांनी आत्मसात करावेत.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार पुढे नेणे अत्यावश्यक आहे. मूर्तीवाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून याला हातभार लागणार आहे.
मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर संयोजक ॲड. शंकर नरोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
—————
चौकट
३०० व्या जयंतीनिमित भरगच्च सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ३०० महिलांना साडी वाटप तसेच नागरिकांना ३०० वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच ३१ मे रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहात जन्मणाऱ्या मुलींच्या नावे ५ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे, असे संयोजक ॲड. शंकर नरोटे यांनी सांगितले.