maharashtrapoliticalsocialsolapur
आई-वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंदी नाहीत…
तळे हिप्परगा ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय....

सोलापूर
जोपर्यंत आई- वडील आहेत तोपर्यंत सांभाळ करा अन्यथा ग्रामपंचायतीकडून कसलाही कागद व शासकीय योजनांसाठी शिफारस द्यायची नाही, असा ठराव उत्तर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायतीने केला आहे. एवढेच काय कोणीही गावाच्या हद्दीत होर्डिंग्ज लावू नये, असा ठराव देखील केला आहे.
आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन ज्यांच्यासाठी प्रपंच फुलविला जातो तेच आयुष्याच्या शेवटच्या काळात परके होतात. आई-वडिलांचे दररोजचे जगणे असह्य करुण सोडले जाते. पर्यायाने आई- वडिलांची चूल वेगळी पेटली जाते.
हे वास्तव थांबवण्यासाठी उत्तर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायतीने जे आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला द्यायचा नाही, वारस नोंद करायची नाही, शिवाय शासकीय योजनेसाठी ठरावात नाव द्यायचे नाही असा ठराव घेतला आहे.