maharashtrapoliticalsocialsolapur

महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून करून घ्यावी विकासकामे

आमदार देवेंद्र कोठे यांची ठाम भूमिका : प्रभाग चलो अभियानाद्वारे होणाऱ्या उत्तम समन्वयामुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधान

 

सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रभागाच्या विकासाची कामे करून घ्या. विनंती करूनही कामे होत नसतील तर ती कामे करून घेण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ठाम भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील विकासकामांबाबत समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या प्रभाग चलो अभियानात भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांचे काम पाहणारे श्रीकांत गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून काम करण्याची ग्वाही दिली. प्रभाग चलो अभियानादरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून याबाबत होणाऱ्या सततच्या आग्रहाचा यशस्वी परिणाम म्हणून कार्यकर्ते आणि मनपा अधिकाऱ्यांमधील सुसंवाद वाढीस लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

 

प्रभागात विकासकामे करत असताना अनेकदा कार्यकर्त्यांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी खटके उडतात. परिणामी, देखभाल दुरुस्तीची कामे, विकासकामे न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सोलापूर महापालिकेचे अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी परस्परांचा सन्मान ठेवून शहर विकासाची कामे करावीत, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी ठाम भूमिका आमदार देवेंद्र कोठे या अभियानादरम्यान सर्वत्र मांडत आहेत. जनतेची कामे घेऊन येणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून सन्मान मिळाला पाहिजे असा आग्रह धरताना आमदार देवेंद्र कोठे हे कार्यकर्त्यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवावा अशी सूचना कार्यकर्त्यांना करत आहेत.

 

 

 

 

शहरातील उर्वरित विकासकामांची माहिती घेऊन त्याबाबत भाजपचे बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी, शहर पदाधिकारी, नागरिक यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग चलो अभियान सुरू केले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना प्रभागात काम करताना येणाऱ्या अडचणी विचारून त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून मनपा अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना देण्यात येत आहेत.

शुक्रवारी प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील विकासकामांबाबतच्या समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी प्रभाग चलो अभियान इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात घेण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सूचना केल्या.

 

 

 

 

 

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहर विकासाची कामे घेऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आला तर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सन्मानाने त्यांना खुर्ची द्यावी. त्यांचे फोन घ्यावेत. आणि त्यांना लागेल ते सहकार्य करावे. बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांनी सुचवलेली विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल तितका निधी आम्ही देणार आहोत. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखून त्यांच्याकडून विकासकामे करून घ्यावीत.

 

 

 

 

यावेळी श्रीकांत गायकवाड या कार्यकर्त्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा योग्य मान ठेवून आगामी काळात काम करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगताच आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या कार्यकर्त्याचे जाहीरपणे कौतुक करत सर्वांना टाळ्यांचा कडकडाट करून अभिनंदन करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रशासनातील घटकांचा सन्मान राखत शहर विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचे अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button