पोलिसांनी आरोपीस दिली क्लीनचिट, न्यायालयाने केले आरोपी, मात्र खटल्या अंती निर्दोष !…
सोलापूर
दिनांक : यशवंत रामचंद्र वाघमारे वय 57 वर्ष राहणार- तरटगाव तालुका- मोहोळ जिल्हा सोलापूर यास बहिणीने केलेली केस काढून घे म्हणून मारहाण करून त्याचे राहते घर पेटवून दिल्या प्रकरणी विलास दशरथ पाटील वय 50,अनिल दशरथ पाटील वय 47, दशरथ तात्या पाटील वय 80 दिनेश राजाराम पाटील वय 30,मारुती पांडुरंग वाघमारे वय 65 तरटगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्यासमोर होऊन गुन्हा शाबीत न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की रामचंद्र याची बहीण कृष्णाबाई महादेव कोळी हिने सन 2006 मध्ये यातील आरोपी विलास पाटील व इतरां विरुद्ध केस दाखल केली होती ती केस मोहोळ न्यायालयात चौकशीस आली होती.
दि.18. 11.2012 रोजी रात्री 10 वा. सुमारास रामचंद्र हा त्याच्या घरासमोर बसला असता वरील आरोपी हे त्याच्या घरासमोर आले व त्यांच्या हातात पेट्रोल, काडीपेटी,लोखंडी पहारअसे होते त्यांनी रामचंद्राला तुझ्या बहिणीने केलेली केस मोहोळ कोर्टातून काढून घेण्याबाबत तुझ्या बहिणीला सांग म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण करून त्यांचे राहते घर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अशा आशयाची फिर्याद रामचंद्र वाघमारे यांने कामती पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिस हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील आरोपी विलास दशरथ पाटील हा घटनेच्या वेळी तेथे उपस्थित नव्हता असा पुरावा मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यास गुन्ह्यातून वगळले होते. मात्र न्यायालयाने त्यास आरोपी करून त्याच्याविरुद्ध खटला चालू केला.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकंदर सहा साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात जी केस काढून घेण्यासाठी घर पेटवले त्यामध्ये पीडितेची साक्ष होऊन गेली आहे, त्यामुळे त्यासाठी घर पेटविण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच घर पेटवल्याचा कोणताही पुरावा कोर्टासमोर आणलेला नाही असा युक्तिवाद मांडला, तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे,ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. दत्ता गुंड, ॲड. रविंद्र पाटील सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद कुर्डूकर, ॲड. नरखेडकर यांनी काम पाहिले.