maharashtrapoliticalsocialsolapur

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माढा येथील जाहीर सभेसाठी सोलापुरातून जाणार हजारो शिवसैनिक…

जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत : २१ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर जिल्ह्यात....

 

सोलापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २१ एप्रिल रोजी माढा येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत दिली. शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली.

२१ रोजी सकाळी १०.३० वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवीर ऍग्रो ऑईल प्रा. लि. या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माढा येथे होणार असून यानंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी बैठकीत घेतला.

जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करावी. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहेत. शिवसेना पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील विस्तारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा मोठा उपयोग होणार असल्याने शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थिती लावावी, असेही शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी याप्रसंगी सांगितले.

शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका होत्या. आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समोर आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावेत. या जाहीर सभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. जाहीर सभेची तयारी म्हणजे पक्षकार्याची संधी म्हणून शिवसैनिकांनी याकडे पहावे असे आवाहनही शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी याप्रसंगी केले.

मनोज शेजवाल म्हणाले, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शाखानिहाय बैठका घेऊन शिवसैनिकांसोबत मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेस उपस्थित रहावे.

या बैठकीस शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाल, सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण, अमर पाटील, युवासेना शहर प्रमुख समर्थ मोटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख
नवनाथ चव्हाण, राजू शिंदे, शशी शिंदे, अक्षय बिद्री, संजय सरवदे, समर्थ बिराजदार, युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द, महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिता माळगे, जिल्हाप्रमुख रवीना राठोड, शहर प्रमुख जयश्री पवार, अनिता गवळी, संगीता खांबसकर , मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, युवा सेनेचे रणजीत भंडारे, नामदेव पाटील, रोहन चौगुले, राज मिसाळ आदी उपस्थित होते.
——————-
चौकट
भगव्या साड्या अन् भगव्या फेट्यांनी रंगणार सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी सोलापुरातून हजारो महिला भगव्या रंगाची साडी परिधान करून सभेस उपस्थिती लावणार आहेत. तर हजारो शिवसैनिक भगवे फेटे बांधून सभेला जाणार आहेत. त्यामुळे भगव्या साड्या आणि भगव्या फेट्यांनी ही जाहीर सभा रंगणार आहे, असे प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button