हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर:- जयदीप माने …
वाळू उपसा करण्यासाठी भीमा नदीच्या पात्रालागत शेती असणाऱ्या शेतकऱ्याने नदी पात्रात जाण्यासाठी रस्ता देण्यास नकार दिला म्हणून त्यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंद केसरी पैलवान समाधान पाटील , रा. नजीक पिंपरी, ता. मोहोळ यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अट्रोसिटी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची हकीकत अशी की, यातील फिर्यादी यांची भीमा नदीचे पात्रालगत शेती आहे. आरोपी समाधान पाटील यांना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करायचा होता म्हणून ते फिर्यादीच्या शेतातून रास्ता मागत होते. परंतू फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने पै. समाधान पाटील यांनी फिर्यादिस बेगमपूर येथील हॉटेलमध्ये बोलवून घेऊन जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अशी फिर्याद कामती पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.
आरोपी समाधान पाटील यांनी सोलापूर सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पै. समाधान पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली होती. सदर अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीप मारणे यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की आरोपीचा उत्कर्ष सहन होत नसल्यामुळे त्याचा मत्सर करणाऱ्या लोकांनी फिर्यादीला हाताशी धरून खोटी केस केलेली आहे. न्यायमूर्तींनी सरकारी पक्ष, फिर्यादीचे वकील व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी हिंद केसरी पै. समाधान पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
याप्रकरणी आरोपी पै. समाधान पाटील यांच्यातर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. रश्मी तेंडुलकर यांनी काम पाहिले.