भुमि अभिलेखाच्या अधिकाऱ्यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर…
सोलापूर
येथील भुमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी नितीन सावंत (उपअधिक्षक), मकरंद काडगावकर (शिरस्तेदार) श्रीशैल काळे (छाननी लिपीक) यांची भुमि अभिलेख प्रकरणामध्ये बेकायदेशीरपणे मोजणी करून पोट हिस्सा मंजूर केल्याबद्दलच्या गुन्ह्यामध्ये सत्र न्यायालयाने सशर्त अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी एस. व्ही. पोतदार यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील बिनशेती खुली जागा सर्व्हे नं. ३०६/१ यासी नवीन सव्र्व्हे नं.१५४/१ या जागेचे एकूण क्षेत्र ४ हे. ७६ आर. या मिळकतीवर फिर्यादी व फिर्यादीचे ५ चुलत भाऊ असे एकूण ६ जणांचे वारसा हक्काने मालकी आहे. त्यासंदर्भात अर्जदार अप्पासाहेब भोपळे यांना मोजणी मागण्याचा अधिकार नाही, प्रकरणाची कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता फिर्यादी यांचे गैरहजेरीत वर नमूद मिळकतीचा परस्पर मोजणी करून यातील संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून इतर मिळकत धारकांना त्याचा फायदा करून दिला, अशी फिर्याद दिली होती. सदर प्रकरणी भुमि अभिलेख अधिकारी नितीन सावंत, मकरंद काडगावकर, श्रीशैल काळे यांनी अटकपूर्व जामीन मिळणेकामी अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपींनी कोणतीही बनावट कृत्ये केलेली नाहीत व त्यांना पोलीस कोठडीची आवश्यता नाही व आरोपी हे पोलीसांना तपासकामात सहकार्य करतील असा युक्तिवाद केला. आरोपींच्या वकिलांचा हा युक्तिवाद विचारात घेऊन मा. सत्र न्यायालयाने आरोपींना पोलीस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावण्याच्या अटीवर सशर्त अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सदर कामी आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. रणजीत चौधरी, अॅड. प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले.