सोलापुरात आंतरराज्यीय दरोडेखोर जेरबंद! पोलीस पथकाची उत्तुंग कामगिरी; ३ गंभीर गुन्हे उघड…

सोलापूर:
सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणारे तसेच वाहन चोरी करणारे दोन सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार फौजदार चावडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाच्या अथक प्रयत्नातून हा महत्त्वपूर्ण तपास यशस्वी झाला असून, जबरी चोरी आणि वाहन चोरीचे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक ११/१०/२०२५ रोजी पहाटे अवंती हौसिंग सोसायटीमध्ये चार सशस्त्र इसमांनी फ्लॅटचे दरवाजे तोडून जबरी चोरी केली होती. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त श्री. विजय कबाडे, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. प्रताप पोमण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महादेव राउत आणि पोलीस निरीक्षक श्री. तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
🕵️♂️ विजापूरमधून आरोपींना अटक
तपासादरम्यान, जबरी चोरी करणारे आरोपी हेच त्याच रात्री चोरीस गेलेली एक मारुती अल्टो कार आणि दोन मोटारसायकली चोरणारे असावेत असा पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. संजय क्षिरसागर यांनी पथकासह तातडीने कर्नाटक राज्यातील विजापूर येथे धाव घेतली.
दिवस-रात्र शोध घेतल्यानंतर दरोड्याच्या गुन्ह्यात ७ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला मुख्य आरोपी मेरबानसिग मायासींग दुधानी (वय ३४, रा. विजापूर, कर्नाटक) याला दिनांक १४/१०/२०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार हरेश विजयकुमार रामत्री (वय ३२, रा. ठाणे) यालाही दिनांक १६/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल:
या आरोपींकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, एक मारुती अल्टो कार, सोन्याची अंगठी, रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू, कटावणी आणि दोन लोखंडी रॉड असा एकूण ₹ १,५२,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
🏆 कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक
हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी सपोनि / श्री. संजय क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोहवा/प्रविण चुंगे, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/कृष्णा बडुरे, पोकों/विनोद व्हटकर, पोकों/अमोल खरटमल, पोकॉ/विनोद पुजारी, पोकों/शशीकांत दराडे, पोकॉ/अजय चव्हाण, पोकों/आतीश पाटील, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ/किशोर तुकुवाले, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकॉ/सुधाकर माने, पोकों/पंकज घाडगे, पोहवा/अयाज बागलकोटे आणि मपोशि/पुजा बोरकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. उर्वरित दोन आरोपींचा तपास अजूनही सुरू आहे.



