सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे व जिल्हा कोषागार कार्यालयातील लिपिक संतोष सावळे यांची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता…
सोलापूर
यातील हकिकत –
यातील तक्रारदार पोलीस शिपाई यांना श्री. मनोज पाटील, तत्कालीन पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दि. 20/11/18 ते 27/4/19 या कालावधीत निलंबित केले होते. सदर कालावधीतील निर्वाह भत्ता मिळण्यासाठी त्यांनी तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्याकडे दि. 1/5/19 रोजी अर्ज केलेला होता. सदरचे बिल मंजूर झाले अगर कसे? याबाबत त्यांनी दि. 4/6/19 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, लेखा विभागात नेमणुकीस असलेले सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे यांची भेट घेतली असता, त्यांनी कोषागार कार्यालयातील लिपिकास देण्यासाठी लाच म्हणून रक्कम रु. 500/- ची मागणी केली, तसेच तक्रारदाराने त्याच्या बिलासंदर्भात ट्रेझरी कार्यालयातील क्लार्क साळवे यांची भेट घेतली असता, त्यांनीही रक्कम रुपये 500/- ची मागणी केली म्हणून दि. 7/6/19 रोजी तक्रारदाराने सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे व लिपिक सावळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला होता.
सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपींकडून लाचेसंदर्भात मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील सापळ्याची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येऊन लिपिक सावळे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते व नंतर सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम 7, 12 अन्वये दि. 8/6/2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर आरोपींविरुद्ध सोलापूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आलेले होते.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते.
सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे आरोपी भांगरे यांनी लाचेची मागणी केल्या संदर्भातील कोणत्याही ठोस व सबळ पुरावा सादर करू शकले नाहीत, आरोपी सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे यांच्याकडे तक्रारदाराचे कोणतेही शासकीय काम प्रलंबित नव्हते, तसेच त्यांनी लाचेची मागणी केली नसतानाही त्यांना केवळ आकस बुद्धीने व राजकीय पुढार्यांच्या दबावापोटी खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास ॲड. निलेश जोशी यांनी आणून दिले.
तसेच ॲड. पाटील यांनी लिपिक साळवे यांच्या वतीने सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये महत्त्वपूर्ण व ठळक विसंगती व तफावती असल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सदर प्रकरणात सहाय्यक फौजदार लक्ष्मण भांगरे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी व लिपिक सावळे यांच्या वतीने ॲड. पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची लाचलुचपत कायद्याचे कलम 7 व 12 मधून सोलापूर येथील मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे.
सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. पाटील, ॲड. यशश्री जोशी, ॲड. ओंकार परदेशी व ॲड. राणी गाजूल यांनी काम पाहिले.