दुचाकी ताब्यात घेत असताना तरुणास मारहाण विजापूर नाका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल…
घटनेत एक जण गंभीर जखमी...

सोलापूर
(प्रतिनिधी) स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्ट वरील बजाज कंपनीची दुचाकी क्रं.एमएच.१३.ईडी.९२८६ हे वाहन ताब्यात घेत असताना तरुणास शिवीगाळ करत जाणीवपूर्वक बेदम मारहाण केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान नुराणी मस्जिद जुना विजापूर नाका येथे घडली.याप्रकरणी तुषार कैलास गायकवाड (वय-२०,रा.सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ३,सलगर वस्ती पोलीस ठाणे शेजारी) याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्याच्या फिर्यादीवरून अविनाश मदनावाले,राजेश मदनावाले,विशाल जाधव व एका अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की,स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील वरील क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत असताना वरील संशयित आरोपी यांनी मिळून फिर्यादी व फिर्यादी यांचे मित्र लक्ष्मण जाधव,समर्थ गायकवाड,विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिवीगाळ करून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच अविनाश मदनावाले याने खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खल्लास करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत खोऱ्याने मारून जखमी केले.तसेच लक्ष्मण जाधव हा मारहाणीत जखमी होऊन खाली पडला असता,त्याला देखील अविनाश आणि राजेश यांनी मिळून परत जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशाने फरशी डोक्यात घालून मारहाण केली.असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.