डॉ.वाघचवरे यांनी इटलीमध्ये रोवला भारताचा झेंडा…
फुल आयर्न मॅन होणारे सोलापूरचे पहिलेच सुपुत्र...
सोलापूर
(प्रतिनिधी):- इटली देशातील सर्विया प्रांतात शनिवार 21 सप्टेंबर रोजी “फुल डिस्टन्स आयर्न मॅन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सोलापूरचे सुपुत्र प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित वाघचवरे यांनी ही अवघड स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
संपूर्ण जगात अंत्यत अवघड अशा समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर भारतातून 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ .अभिजीत वाघचवरे यांनी “फुल आयर्न मॅन” हा खिताब मिळवला. असा खिताब मिळवणारे सोलापूरचे पहिलेच सुपुत्र बनले आहेत.
फुल आयर्न मॅन या स्पर्धेमध्ये समुद्रामध्ये चार किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग तर 42 किलोमीटर रनिंग असे तिन्ही क्रीडा प्रकार एकापाठोपाठ एक तुम्हाला पूर्ण करावयाचे असतात .
इटलीच्या या स्पर्धेमध्ये “भूमध्य समुद्राच्या” उसळत्या थंड पाण्याच्या लाटांचा सामना करीत त्यांनी त्यांचे चार किलोमीटरचे स्वीम दोन तास चार मिनिटात पूर्ण केले .
तर 180 किलोमीटरचे सायकलिंग सात तास 40 मिनिटात त्यांनी पूर्ण केले.
सायकलिंग मात्र “सर्वीया प्रांताच्या ” चढ-उतार असलेल्या रस्त्यावर होते जेथे उलट्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे सायकलिंग करणे खूप जड जात होते.
तर शेवटी 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन त्यांनी पाच तास 44 मिनिटात पूर्ण केली .
त्यावेळी त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ राजश्री वाघचवरे या सायकलिंग व रनिंग रूट वर साडे पंधरा तास त्यांचे मनोबल वाढवण्याकरता उपस्थित होत्या.
टीम पाॅवर पीक्स् चे कोच चैतन्य वेल्हाळ यांचे त्यांना कोचींग लाभले व डॉ.अभिजीत यांच्या भगिनी आयर्न मॅन असलेल्या डॉ .स्मिता झांजुर्णे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांना प्रॅक्टिस साठी लाभत गेले. सोलापूरच्या टीम डब्ल्यू प्लस चे त्यांना सतत सहकार्य मिळत आहे.
भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी साडेआठला सुरू झालेली स्पर्धा रविवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांनी पूर्ण केली. डॉ अभिजीत वाघचवरे यांनी ही स्पर्धा 15 तास 36 मिनिटात पूर्ण केली व आकर्षक असे मेडल मिळविले.
ही स्पर्धा पूर्ण झाल्यावर डॉ. अभिजीत म्हणाले की,
” भारतातून एवढ्या दूर इटलीमध्ये येऊन तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन स्पर्धा पूर्ण करणे ही खरंच कसोटीची बाब आहे.
आपली शारीरिक तंदुरुस्ती हीच खरी संपत्ती आहे ती संपत्ती टिकवण्याकरता व्यायामातले सातत्य खूप महत्त्वाचे आहे तर अशा दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत. अशा कठीण स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या पूर्ण करण्याकरता संपूर्ण कुटुंबाचा खूप मोठा आधार आपल्याला लागतो त्यामुळे आपले मनोबल वाढत राहते.
भारतामध्ये याच्या निम्म्या अंतराच्या स्पर्धा होत राहतात त्याच स्पर्धांमध्ये मी सहभाग नोंदवून व चांगल्या वेळेमध्ये त्या पूर्ण करून या मोठ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती”