एक लाख मराठा उद्योजक संकल्प पूर्ती निमित्त मराठा उद्योजक मेळाव्याचे श्री. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन….
मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटिबद्ध - नरेंद्र पाटील...
सोलापूर,
दिनांक 21:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 106 लाभार्थ्यांचा समावेश आहे. हे महामंडळ मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय विषयी मार्गदर्शन करून स्वतःच्या उद्योग उभा करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उभारणी व त्यावरील व्याजाचा परतावा देते. तसेच महामंडळ राज्यातील जास्तीत जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती निमित्त मराठा उद्योजक मेळाव्यात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक अनिल शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विभागीय प्रमुख संकेत लोहार, जिल्हा समन्वयक योगेश वाघ, सुनिल रसाळे, श्रीकांत डांगे, सुधाकर महाराज इंगळे, दिलीप कोल्हे, अनंत जाधव, हरिभाऊ चौगुले, लक्ष्मण महाराज चव्हाण, दास शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, महामंडळाच्या माध्यमातून तरुणांनी आपल्या गावातच उद्योग व्यवसाय उभे करावे. त्यातून रोजगार निर्मिती करून आपल्या गावातील एकही बेरोजगार तरुण रोजगारासाठी बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. महामंडळ शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करत आहे. तरुणांनी पुढे येऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योग उभारणीसाठी मोठा निधी आवश्यक असतो बँकांकडून हा निधी मिळाला तरी त्याच्यावरील व्याजामुळे उद्योजक हैराण होतात. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकांना कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यात येतो. त्यामुळे उद्योजकांना खूप मोठा आधार मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात दहा हजार एकशे सहा लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून 870 कोटीचा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या कर्जावरील व्याजाचा 80 कोटीचा परतावा आत्तापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे महामंडळाच्या या योजना मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी खूप मोठा आधार ठरत असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरूणांनी घेऊन आपले गाव व जिल्हा समृध्द करण्याचे काम तरुणांनी करावे. आपल्या गावात स्वच्छेचे काम, बालसंस्कार, शिक्षण, शाळा लोकसहभागातून सोलापूर जिल्हा समृध्द करण्याचे काम प्रत्येक तरूणाने करून भविष्यात एक उद्योजक ते दहा उद्योजक हे उदिष्ट मनात ठेवुन आपण शासनाच्या योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. पाटील यांनी केले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी कृषि पर्यटनासाठी आपला जिल्हा प्रसिध्द झाला पाहीजे. धार्मिक पर्यटन विकासामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच मध्ये आला पाहिजे. शेती प्रक्रिया उद्योगात आपले गाव व जिल्हा समृध्द होऊन पुढे कसे जाईल अशा प्रकारची शक्ती प्रत्येकाच्या मनात जागृत झाली पाहिजे. प्रत्येक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन आपला जिल्हा ही समृध्द करण्याचे काम करावे. तसेच जास्तीत जास्त तरूणांना उद्योजक बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांतून केले जात आहे. तरी तरुणांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी यशस्वी उद्योजकांचा सत्कार महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील, आमदार सुभाष देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते करून काही उद्योजकांना 15 लाख रुपये कर्जाच्या मंजुरीचे धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक योगेश वाघ यांनी केले तर विभागीय प्रमुख संकेत लोहार यांनी आभार मानले.
***