राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या सरकारी कामात अडथळा, शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह चौघे निर्दोष…. ॲड.बाबासाहेब जाधव

शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र जयराम मोरे, अनिल जालिंदर राऊत, बापूसाहेब अंकुश पाटील व नागनाथ मधूकर साठे यांची राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करणे व आधार क्रमाकांचा एम.पी. आर. डेटाबेसमध्ये समाविष्ट करणेस नकार देऊन सरकारी कामात अडथळा केलेच्या आरोपातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी साहेब यांनी सर्व आरोपींची निर्दोष (डिस्चार्ज) मुक्तता केली.
सदर घटनेची हकीकत अशी की, दि.०६/१०/२०१५ रोजी मा. तहसिल कार्यालय, दक्षिण सोलापूर येथे जुने कुंकुबाई नेत्ररुग्णालय येथे प्रगणक म्हणून नेमलेल्या व हजर तालुक्यातील एकूण ८७ शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करणे आणि आधार क्रमांकाचा एम.पी.आर. डेटाबेसमध्ये समाविष्ट करणेसाठी कार्यक्रमांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु वरील नमूद आरोपींनी सदर कामावर बहिष्कार घातला व त्यामुळे सदरच्या दिवशी इतर सर्व हजर असलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण घेता आले नाही. तसेच प्रशिक्षणास आवश्यक असणारे साहित्य घेण्यास नकार दिल्यामुळे प्रशिक्षण देता आले नाही. त्यामुळे अव्वल कारकुन चंद्रकांत नागनाथ घाडगे यांनी सदर बझार पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर प्रकरणाचा तपास करुन आरोपीविरुध्द दोषारोप पत्र मे. कोर्टात दाखल केले. परंतु केस चालविणेपूर्वीच आरोपींनी अॅड. बाबासाहेब जाधव यांच्यामार्फत डिस्चार्ज अर्ज दाखल केला. शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रत्यक्ष जनगणनेचे काम व निवडणुकीचे कामे करणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे शिक्षकावर बंधनकारक नाही. तसेच शाळेतील एकाच वेळी सर्व शिक्षकांना अशैक्षणिक कामास लावता येत नाही, परिक्षा असल्याने सर्व शिक्षकांना शाळा सोडता येत नाही, असा युक्तिवाद अॅड. बाबासाहेब जाधव यांनी केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी साहेब यांनी सर्व आरोपींची निर्दोष (discharge) मुक्तता केली.
सदर खटल्यात आरोपीतर्फे अॅड. बाबासाहेब जाधव, अॅड. स्नेहा नागटिळक, अॅड. गायत्री जोशी तर सरकारतर्फे अॅड. आनंद कुर्दुकर यांनी काम पाहिले