
सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास गुळवंची तांडा व शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पाच गुन्ह्यात 8450 लिटर रसायनासह तीन लाख 18 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून मंगळवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर विभागाच्या अ, ब, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी सामूहिकपणे उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढयाकाठी छापा टाकून करण राजू पवार, वय 28 वर्षे या इसमास 1400 लिटर रसायनासह अटक केली. तसेच गुळवंची तांड्याच्या पश्चिमेस आंब्याच्या झाडाजवळ एका हातभट्टी ठिकाणावरून सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. निरीक्षक अ विभागाच्या पथकाने देशमुख वस्ती केगाव ता.उत्तर सोलापूर येथे नितीन सुरेश चव्हाण, वय 24 या इसमाच्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर छापा टाकून आठशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले.
तसेच शिवाजीनगर केगाव येथील डेंटल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या दोन ठिकाणांवर छापे टाकून 4700 लिटर रसायन जप्त केले. या संपूर्ण कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टी दारू बनविण्याकरता लागणारे 8450 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरिक्षक जगन्नाथ पाटील, सुखदेव सिद, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सरवदे, मानसी वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, अण्णा करचे, अनिल पांढरे, अशोक माळी, योगीराज तोग्गी व वाहन चालक रशीद शेख ,दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.