crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मुळेगाव गोळीबार प्रकरणात पिस्टल पुरविणारा आरोपी जेरबंद आरोपीकडून आणखी एक पिस्टल हस्तगत; सोलापूर तालुका पोलिसांची कारवाई

सोलापूर

मुळेगाव परिसरात कॅश लुटण्याच्या उद्देशाने झालेल्या गोळीबाराच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर तालुका पोलिसांनी आणखी एका आरोपीला जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील आरोपींना गोळीबार करण्यासाठी पिस्टल पुरविणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी आणखी एक पिस्टल हस्तगत केले आहे.
दिनांक 15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. ऍपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी (वय 37, रा. कर्णिकनगर, सोलापूर) हा कंपनीच्या दिवसभराच्या कलेक्शनची रक्कम कंपनीच्या मालकाच्या घरी घेऊन जात असताना सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत अज्ञात आरोपींनी त्याचा पाठलाग केला.

 

 

 

पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून आलेल्या आरोपींनी कॅश लुटण्याच्या उद्देशाने चालकाला जीवे ठार मारण्याच्या हेतूने रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले. यातील गोळीचा छरा चालकाच्या छातीच्या उजव्या बाजूस लागल्याने तो जखमी झाला होता. या घटनेप्रकरणी एजाज तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक सत्तूर, एर्टिगा कार तसेच दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात आरोपींना गोळीबार करण्यासाठी पिस्टल पुरविणाऱ्या व्यक्तीचा सहभाग समोर आल्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी संबंधित आरोपीला 16 सप्टेंबर रोजी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक 10, सोलापूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

पोलिस कोठडीदरम्यान आरोपीकडून आणखी एक पिस्टल हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

 

कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशी कोळेकर, अनंत चमके, महेश कटकदौंड, फिरोज मियावाले, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button