अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; १७ पिस्तूलांसह ४७ जिवंत काडतुसे जप्त
मध्य प्रदेशातून महाराष्ट्र-कर्नाटकात अवैध शस्त्रांचा पुरवठा; ६ आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू

सोलापूर
अकलूज पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १७ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन आरोपी फरार आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि वाहन असा एकूण ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वजाळे याच्याकडे शस्त्रांबाबत चौकशी केली असता त्याने ही पिस्तुले व काडतुसे राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. पुढील तपासात या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता (रा. रांजणगाव, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याच्याकडून होत असल्याचे समोर आले.
सोनगीरमध्ये ४ पिस्तूल व २५ काडतुसे जप्त
विकास वजाळे याने दिलेल्या माहितीनुसार अनिल मेहता हा सोनगीर, जि. धुळे येथे शस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अकलूज पोलिसांचे पथक सोनगीर येथे पोहोचले. संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता चार अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी टेंभुर्णी परिसरात कारवाई करून राहुल सतीश माने यालाही अटक केली. राहुल माने हा सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
विविध ठिकाणी शस्त्रांची विक्री
तपासात विकास वजाळे याने शस्त्रे विविध व्यक्तींना विकल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, प्रदीप पांडुरंग माने, शनि भारत बनसोडे आणि सुमित नाना लवटे यांच्याबाबत तपास सुरू केला.
महादेव कोरके याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे, विजय किरणजी याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे, तर प्रदीप माने आणि शनि बनसोडे यांच्या घरझडतीत प्रत्येकी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तसेच सुमित नाना लवटे याच्याकडूनही एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल सतीश माने याने तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार सहा पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सहा आरोपी अटकेत
या कारवाईत विकास कैलास वजाळे, राहुल सतीश माने, महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, अनिल पंचलाल मेहता आणि सुमित नाना लवटे या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तर प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अटक आरोपींकडे कोणत्याही प्रकारचे पिस्तूल अथवा जिवंत काडतुसे बाळगण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ५, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विक्रम साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे करीत आहेत.
अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याची मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.



