मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात
२४ आरोपी निष्पन्न ; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

सोलापूर
मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) वेगाने तपास सुरू असून, आतापर्यंत या प्रकरणात २४ सहआरोपी निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तपासादरम्यान दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले यास प्राप्त झालेल्या अवैध पैशांच्या विल्हेवाटीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट, तर रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या कोठडीच्या मागणीवर न्यायालयाने तिघांनाही २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपी रामदास झोळ फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास एसआयटीमार्फत करण्यात येत आहे.



