देशभक्तीच्या रंगात रंगला एनटीपीसी सोलापूरचा ८०वा स्वातंत्र्यदिन

सोलापूर
एनटीपीसी सोलापूर येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन प्रसंगी प्रशासकीय ब्लॉक तसेच बालभवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सीआयएसएफमध्ये केक कापून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
टाउनशिपमधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टेडियममध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रकल्प प्रमुख श्री. मोहन बट्टेकट यांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एनटीपीसी सोलापूरच्या विविध उपलब्धी आणि विभागांच्या योगदानाचे कौतुक करत एनटीपीसी तसेच देशाच्या प्रगतीसाठी निरंतर योगदान देण्याचे आवाहन केले.

समारंभास श्री शुभाशिष बंदोपाध्याय, महाप्रबंधक (प्रचालन एवं अनुरक्षण), श्री हेमंत कुमार शाक्य, महाप्रबंधक (प्रचालन एवं एफ.एम.), श्री कन्हैया दास, महाप्रबंधक (मानव संसाधन), श्रीमती शैला मोहन, अध्यक्षा, सुजना महिला मंडल, श्री प्रवीण कुमार सिंह, असिस्टंट कमांडंट, सीआयएसएफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सुजना महिला मंडळाच्या सदस्या, सीआयएसएफ जवान, विद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकवर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच टाउनशिपमधील नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांसह सीआयएसएफ जवानांचे मार्चपास्ट व मॉक ड्रिल प्रदर्शन. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थ्यांसह सीआयएसएफ जवानांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

देशभक्तीपर गीतांनी गुंजलेला परिसर, तिरंग्याच्या रंगात सजलेले वातावरण आणि उपस्थितांमध्ये दिसून आलेला उत्साह यामुळे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला. एनटीपीसी सोलापूरमध्ये आयोजित हा कार्यक्रम देशप्रेम, एकता, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव ठरला.




