india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री रेवणसिद्धेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते उद्घाटन

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जेष्ठ विधीज्ञ ऍड. मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती : श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला गती

 

सोलापूर : प्रतिनिधी

श्री रेवणसिद्धेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटन गुरुवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जेष्ठ विधीज्ञ ऍड. मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रावण महिन्याच्या पहिल्यादिवशी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा माझा मानस असून, यासाठी मंदिरासह परिसरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या विकासासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. देवस्थान समितीच्या सूचनेनुसार ६८ लिंगांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होणार आहे. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी २१ कोटींचा आराखडा मंजूर असून, त्यापैकी ७ कोटींची कामे सुरू आहेत.

 

 

धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी ४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून तलावाचा विकास करून संपूर्ण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न आहे. सोलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही आमदार श्री. कोठे म्हणाले.

नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रयत्नातून रेवणसिद्धेश्वर मंदिरातील गाभारा, शिखर आणि आवारातील फरशीकरणाचे काम पूर्ण झाले असून, मंदिर परिसरातील उर्वरित विकासकामेही पूर्णत्वास नेऊन श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, प्राणिसंग्रहालय आणि धर्मवीर संभाजी तलाव असा एकात्मिक पर्यटन परिसर विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

 

श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विविध सुशोभीकरणाची कामे करण्याची मागणी गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांकडून होत होती. त्यामुळे हे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाबरोबरच अज्ञात भाविकाच्या योगदानातून मंदिराच्या अंशतः जीर्णोद्धाराचे कामही करण्यात येत आहे. मंदिराच्या सुशोभीकरणाचे आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू केल्यामुळे भाविकांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक अजय पोन्नम, शिवराज गायकवाड, आनंद मुस्तारे, रेवणसिद्धेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम शिंगारे, बसवराज शिंगारे, लक्ष्मीकांत बिराजदार, शिवराज बुक्कानवरे, मल्लू जाधव, सिद्धू कुर्ले, बसवराज आळगेकर, बसवराज पाटील, महेश कुरले, दिनेश स्वामी, मल्लिनाथ शिंगारे तसेच रेवणसिध्देश्वर नगर पुरुष महिला भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button