वंदे मातरम च्या जयघोषात तिरंगा पदयात्रा उत्साहात
आईशक्ती फाउंडेशनचा उपक्रम : तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

सोलापूर : प्रतिनिधी
‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ च्या जयघोषात गुरुवारी तिरंगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. आईशक्ती फाउंडेशनकडून आयोजित या पदयात्रेत तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला.
मार्कंडेय हायस्कूलपासून या तिरंगा पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी भारतमातेचा वेश परिधान केलेली प्रशालेची विद्यार्थिनी होती. त्यामागे दोन हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी हातात तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते. मार्कंडेय हायस्कूलपासून सुरुवात झालेली ही तिरंगा पदयात्रा खडी मशीन चौक, क्रांती चौकमार्गे विविध नगरांमधून मार्कंडेय हायस्कूलमध्ये विसर्जित झाली. साडेतीन किलोमीटर काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा जागर दिसून आला. याप्रसंगी देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
तिरंगा यात्रेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा नगरसेविका रोहिणी तडवळकर, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार, उपमुख्याध्यापक मल्लिकार्जुन पाटील, पर्यवेक्षक सुमन बिराजदार, शिक्षक पंचय्या स्वामी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला शिरूर, तेजस्विनी मरीगुड्डी, बाबू चिप्पा, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येलदी, उमेश चिट्याल, अंबादास पोगूल, व्यंकटेश बंडा, शुभम चिट्याल, मुख्याध्यापक अमोघसिध्द कुंभार, मल्लिकार्जुन पाटील, पंचय्या स्वामी, सुमन बिराजदार उपस्थित होते.
———-
चौकट
३० फूट कापडी झेंड्याने वेधले लक्ष
आईशक्ती फाउंडेशनकडून तिरंगा पदयात्रेसाठी ३० फूट कापडी तिरंगा झेंडा बनविण्यात आला होता. हा झेंडा घेऊन विद्यार्थी – विद्यार्थिनी तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते. ३० फुटांच्या भव्य तिरंगा झेंड्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन विडी घरकुल परिसरात विडी कामगारांच्या आणि श्रमिकांच्या मुलांच्या सहभागाने हा कार्यक्रम झाल्यामुळे पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. असा कार्यक्रम प्रथमच झाल्याचे सांगत या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले.



