राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० मध्ये ३९ वी आंतर-कंपनी क्रीडा स्पर्धेचा सांगता समारंभ संपन्न.

सोलापूर
राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक १०, सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७ दिवस चाललेल्या ३९ व्या आंतर-कंपनी क्रीडा स्पर्धेचा सांगता समारंभ उत्साहात व दिमाखात पार पडला. या क्रीडा महोत्सवात जवानांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले अभूतपूर्व कौशल्य आणि उत्साह दाखविला.
समादेशक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत गटातील विविध कंपन्यांच्या जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या आयोजनामुळे जवानांच्या दैनंदिन कर्तव्यकाळातील ताणतणाव दूर होण्यासोबतच त्यांच्यामध्ये निकोप स्पर्धा, ताजेपणा आणि सांघिक भावना निर्माण होण्यास मोठी मदत झाली.सात दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, ॲथलेटिक्स तसेच विविध वैयक्तिक खेळांचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान अत्यंत पारदर्शक पद्धतीने सर्वोत्तम गुणांचे खेळाडू आणि कसदार संघांची निवड करण्यात आली.

सांगता समारंभप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विजयी संघांचा गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गटातील सहाय्यक समादेशक दिलीप शिवाजी तडाखे, पोलीस निरीक्षक संजय महादेव कुंभार, पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण ज्ञानेश्वर पाटील तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडा समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी समादेशक डॉ. दिपाली काळे यांनी जवानांचे कौतुक करताना सांगितले की, कठोर व खडतर कर्तव्य बजावताना जवानांना मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आंतर-कंपनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जवानांनी दाखविलेला सहभाग व शिस्त कौतुकास्पद असून, निवड झालेले उत्कृष्ट खेळाडू आगामी उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या गटाचा झेंडा नक्कीच उंचावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

— डॉ. दिपाली काळे
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १०, सोलापूर



