india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

चार हुतात्म्यांच्या अभिवादन सोहळ्यासाठी राज्यपालांना निमंत्रण

१२ जानेवारीला सोलापुरात भव्य कार्यक्रम; हुतात्मा परिवारातील वारसांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा होणार सन्मान

 

 

सोलापूर

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या चार हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत्या १२ जानेवारी २०२७ रोजी महेश गार्डन, सम्राट चौक, सोलापूर येथे विशेष अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रमुख उपस्थिती लावावी, यासाठी सोलापूर सकल मारवाडी समाजाच्या वतीने नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी राज्यपालांना निवेदन देऊन निमंत्रण दिले आहे.

 

 

सोलापूर हे चार हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा कुर्बान हुसेन, हुतात्मा जगन्नाथ शिंदे आणि हुतात्मा किसन सारडा या चारही हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. ब्रिटिश सरकारने १२ जानेवारी १९३१ रोजी या चारही स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली. त्यांच्या बलिदानाला आता ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

विशेष म्हणजे, हुतात्मा किसन सारडा हे मारवाडी समाजाचे पहिले हुतात्मा होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान संपूर्ण मारवाडी समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे मारवाडी समाजाच्या वतीने किसन सारडा यांच्यासह सोलापूरच्या चारही हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

 

या कार्यक्रमात हुतात्मा परिवारातील वारसांचा तसेच मारवाडी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्र यांसह विविध क्षेत्रांत सोलापूरच्या विकासात योगदान देणाऱ्या समाजबांधवांच्या कार्याचा गौरव करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर शहरातील मारवाडी समाजाने शिक्षण, उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

१२ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या या अभिवादन सोहळ्यास राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रमुख उपस्थिती लावावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन सोलापूर सकल मारवाडी समाज, मारवाडी सम्मेलन आणि राजस्थानी समाजाच्या विविध संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे. हे निवेदन देताना राजस्थान येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष अमित असोपा, जयप्रकाश दाधिच आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button