सास-याचा खून करणाऱ्या जावयाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला:- जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत…

सोलापूर
सासूच्या खूनप्रकरणी आरोपी असलेल्या जावयाचा जामीन अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी सादिक सैपन दफेदार (रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 97/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणातील फिर्यादी आलम उर्फ लाला जहाँगीर शेख (रा. इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारास इंगळगी ते कणबस जाणाऱ्या रोडलगत असलेल्या शेतगट क्रमांक 4 मध्ये उसाचे पीक पाहण्यासाठी गेलेल्या सिकंदर मुल्ला शेख यास आरोपी सादिक दपेदार याने त्याची पत्नी शाहनाज दपेदार हिच्याशी झालेल्या घरगुती वादाचा राग मनात धरून चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेत सिकंदर शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जामिनासाठी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना, आरोपीने गुन्हा केलेला नसून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, सरकार पक्षातर्फे आरोपीविरुद्ध प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो तसेच सरकार पक्षाच्या पुराव्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सादिक दपेदार याचा जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने यांनी बाजू मांडली.



