लांबोटीतील छाप्यात १३ जनावरे जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..मोहोळ तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई, जनावरांच्या व्यवहार प्रकरणी तपास सुरू
हिंदवी सेनेच्या माहितीनंतर छापा, जनावरे गोशाळेत हलवली.. लांबोटी प्रकरण चर्चेत, पोलिसांनी जप्त केली १३ जनावरे

नंदीवाले झाले कसायांचे दलाल : सुधीर बहिरवाडे
सोलापूर : प्रतिनिधी (मोहोळ)
मोहोळ तालुक्यातील लांबोटी परिसरात जनावरांच्या कथित अवैध खरेदी-विक्री व वाहतुकी बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत १३ जनावरे जप्त केली आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हिंदवी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांबोटी परिसरात काही जनावरांची विक्री कत्तलीसाठी करण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबतची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांनी पडताळणीची प्रक्रिया सुरू केली.

त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाई दरम्यान काही व्यक्तींनी घटना स्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना तेथे १३ जनावरे आढळून आली. यामध्ये खोंड आणि गायींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व जनावरे ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हिप्परगा येथील तेजामृत गोशाळेत हलविण्यात आले. या प्रकरणी राम वाघमोडे, रावसाहेब वाघमोडे आणि रामभाऊ वाघमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची सत्यता निश्चित होणार आहे.
हिंदवी सेनेचे पदाधिकारी सुधीर बहिरवाडे, लतेश हिरवे आणि इतर कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून जनावरांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे, मोहोळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवलकर, पीएसआय माळी आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.

यावेळी हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, हिंदवी सेनेचे सचिव अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेंडगे, हिंदवी सेनेचे गोरक्षा प्रमुख लतेश हिरवे व उपस्थित गोरक्षक अक्षय बनसोडे, सुरज शिंदे, अर्जुन उबाळे, राहुल कांबळे, सुमित लांडगे, जशवंत अंकम हे उपस्थित होते दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांकडून जनावरांच्या वाहतुकीसंबंधी सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. तपास अहवालानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



