विजयाची हॅट्रिक , आमचा नेता लई पॉवर फुल्ल ! महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल च्या निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.मिलिंद थोबडे रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी….
सोलापुरात निघाली विजयी रॅली....

मुख्य संपादक -वैभव गंगणे
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत घवघवीत आणि दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल सोलापूरचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे साहेब यांचे सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने आज ऐतिहासिक स्वागत करण्यात आला.
निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्यानंतर ॲड. मिलिंद थोबडे सर आज दुपारी सोलापूर बार असोसिएशनला सदिच्छा भेट देण्यासाठी सोलापुरात आले होते. तत्पूर्वी, दुपारी ठीक १:३० वाजता ‘रंग भवन’ येथे त्यांचे आगमन झाले. त्यांचे आगमन होताच तेथे उपस्थित असलेल्या शेकडो वकील बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात त्यांचे जंगी स्वागत केले.
रंग भवन येथून सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बांधवांच्या समवेत एक भव्य रॅली व मिरवणूक काढण्यात आली. थोबडे सरांना अत्यंत सन्मानाने आणि जल्लोषात न्यायालयाच्या मुख्य बार हॉलपर्यंत आणण्यात आले. या रॅलीतील वकिलांचा उत्साह आणि गर्दी सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत होती. त्यानंतर दुपारी २:०० वाजता बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मुख्य सत्कार सभेला दिमाखात सुरुवात झाली. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ॲड. थोबडे सरांच्या या यशाचे कौतुक करताना म्हटले की, “थोबडे सरांच्या रूपाने बार कौन्सिलवर एक अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व सोलापूरला लाभले आहे.”
या सत्कार सभेला सोलापूर विधी क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ वकील उपस्थित होते. त्या सर्वांनी थोबडे सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. कार्यक्रमात ॲड. एन. के. शिंदे, ॲड. धानय्या चिवरी, ॲड. एच. एम. अंकलगी, ॲड. बसवराज सलगर, ॲड. शरद पाटील, ॲड. एन. एम. भडंगे, ॲड. महेश सोलनकर, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. केशव इंगळे, ॲड. गणेश माशाळे, ॲड. अशोक जालादि, ॲड. मलसिद्ध देशमुख, ॲड. मंगला जोशी-चिंचोलकर या सर्व वक्त्यांनी ॲड. मिलिंद थोबडे सरांच्या न्यायालयीन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यपद्धतीची, वकिलांच्या हक्कासाठी लढण्याच्या त्यांच्या वृत्तीची प्रशंसा केली आणि आगामी काळात ते बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवतील, असा विश्वास व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या मनोगतातून सर्व वकील बांधवांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की, “सोलापूर बार असोसिएशनने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आणि दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. या निवडणुकीतील यश हे माझे एकट्याचे नसून संपूर्ण सोलापूर बारमधील वकील बांधवांच्या एकजुटीचे फळ आहे. भविष्यात वकिलांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मी बार कौन्सिलच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध राहीन.” थोबडे सरांच्या या भावनाप्रधान भाषणानंतर संपूर्ण बार हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने घुमून निघाला.
या संपूर्ण दिमाखदार आणि ऐतिहासिक सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सोलापूर बार असोसिएशनचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पाहुण्यांचे, ज्येष्ठ-कनिष्ठ वकिलांचे आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आभार बार असोसिएशनच्या सहसचिव ॲड. मीरा प्रसाद यांनी मानले.



