maharashtrapoliticalsocialsolapur

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर पुण्यात 26 मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या वर्धापन दिनी पुरस्कारचे वितरण…

सोलापूर,(प्रतिनिधी)ः-

 

महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे गेल्या 120 वर्षापासून कार्यरत आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात साहित्य परिषदेच्या शाखा असून त्यामध्ये विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करणार्‍या शाखेला साहित्य परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त पुरस्कार देण्यात येतो. त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षीचे राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मसाप दक्षिण शाखेला निवडण्यात आले असून दि. 26 मे रोजी या पुरस्काराचे वितरण बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती मसाप पुणे चे अध्यक्ष योगेश सोमण, स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर यांनी जाहिर केले.त्याबाबतचे पत्र मसाप दक्षिण शाखेला प्राप्त झाले आहे.

 

 

 

 

मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी गेल्या 120 वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यरत आहे. अनेक थोर लेखकांनी आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ देवून वाड्मय सेवकांची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारूपाला आणले आहे. केवळ पुणे मर्यादा न ठेवता महाराष्ट्र साहित्य परिषदेने राज्यातील अनेक जिल्ह्यात शाखांचे जाळे पसरवले. त्यातच सोलापूरमध्ये सर्वाधिक शाखा निर्माण झाल्या. दक्षिण सोलापूर शाखेने गेल्या अनेक वर्षात शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, लोकजागृती असे विविध उपक्रम घेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने पहाटेच्या प्रवचनमाला ही आगळी वेगळी संकल्पना सत्यात आणून ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांची अमृतवाणी हा कार्यक्रम अखंडपणे सुरू ठेवून यशस्वी केला. महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत विंदा एक स्मरणसाखळी हा बहारदार कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला. मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या तीन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात आणि वेगळेपणाने करण्यात आले.

 

 

 

 

त्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका, सुप्रसिध्द निवेदिका ज्योती आंबेकर यांचे भाषण कला शिबीर हे शिबीर, ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांचा मिश्कीली आणि कविता, कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावरील आधारीत असलेला अनवट शांताबाई, जगप्रसिध्द लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ए आय ची जादू आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान,विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत तर नव वकीलांना प्रेरणादायी ठरली.इमॅजिनियस स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत हिंदी गाण्यावर आधारीत दास्तान ए इश्क कार्यक्रम,पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे व्याख्यान,नरहर कुरुंदकर एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोग, भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यानाने तर गर्दीचा रेकॉर्ड कायम केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संघ यात्रे निमित्त संघ गंगा के तीन भगीरथ हे नाटक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती या विषयावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर भक्त शरद पोंक्षे यांचे व्याखान, सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून सोलापूरचे कर्तुत्ववान तीन सुपुत्र,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना एकाच मंचावर आणून एकत्रीतपणे त्यांची मुलाखत सोलापूरचे चौथे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी घेवून राजकीय प्रगल्भता कशी असते हेच दाखवून दिले.

 

 

 

बागेश्‍वर महाराज यांचे संतसंमेलन, देशभरात गाजलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका डॉ.अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत नाशिक विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी घेतली,श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त याविषयावर सविस्तर माहिती डॉ. रमा गोळवलकर यांनी यावेळी आपल्या व्याख्यानातून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वि वा शिरवाडकर यांच्या जीवनावर व्याख्यानातून योगेश सोमण यांनी विस्तृतपणे माहिती दिली. कवी स्व.दत्ता हलसगीकर, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे पुस्तक प्रकाशन आणि रामदास फुटाणे यांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन, सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन तर नेहमी होते परंतु कारागृहातील बंदी असलेल्यांना काही वेळ विरंगुळा मिळावा या हेतुने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने शाखेचे उपाध्यक्ष तथा हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ तसेच सानिका कुलकर्णी आणि रसिका कुलकर्णी यांचे अभंगाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्कालीन जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या दक्षिण सोलापूर शाखेने असे विविध उपक्रमाचे आयोजन सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आले.

 

 

 

 

कार्यक्रमाचे नेटके नियोजन, शिस्तबध्दता, तेच तेच पणा न आणता विविधता आणून प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवणे, जास्तीत जास्त आणि नवनवे प्रेक्षकांपर्यत कार्यक्रम पाहोचवणे, पारंपारिक पध्दती सोबतच आधुनिकतेचा समावेश करणे, कार्यक्रमाचे आयोजन करताना वेळेचे योग्य नियोजन आणि दिलेल्या वेळेतच कार्यक्रम सुरू करून समारोप करण्याची परंपरा, वर्षभरात राबवलेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करून वेळोवेळी त्याचा हिशोब, ऑडीट आणि अहवाल तयार करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडे वेळेत पाठवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने दक्षिण सोलापूर शाखेला यंदाचा कै. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 26 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

 

 

 

सोलापुरकरांच्या प्रेमामुळेच हा पुरस्कार – रेणुका महागांवकर
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात येतात त्याला सोलापूरकर दिलखुलासपणे प्रतिसाद देतात आणि कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात. सोलापूरकर रसिक श्रोत्यांच्या प्रेमामुळे साहित्य परिषदेने दखल घेवून दक्षिण सोलापूर शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून पुरस्कार जाहिर केला. यामुळे आणखी नवनवीन कार्यक्रम घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी व्यक्त केली…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button