maharashtrapoliticalsocialsolapur

१४५५ कोटी रुपयांच्या रिंगरोडसह चार विकासकामांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची मान्यता

भुयारी मार्ग, चार पदरी बाह्यवळण रस्त्यांची मागणी झाली पूर्ण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे जिल्हावासीयांकडून झाले कौतुक

 

आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी साकडे घालत विकासकामांबाबत निवेदने दिली. आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १४५५ कोटी रुपयांच्या ३३ किमी लांबीच्या रिंगरोडसह सर्व मागण्या पूर्ण करत सोलापूरकरांना गुरुवारी सुखद धक्का दिला.

 

 

 

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. श्री. गडकरी अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर आणि परिसरातील ४ पदरी रस्ते, बाह्यवळण मार्ग तसेच भुयारी मार्गाची मागणी करणारे निवेदने दिली. यानंतर अक्कलकोट बस स्थानक येथे झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागण्यांना मंजुरी दिली.

 

 

 

 

 

अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक ते महालक्ष्मी मंदिर तसेच मल्लिकार्जुन नगर येथे वारंवार अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी येथे भुयारी मार्ग करावा आणि अक्कलकोट रस्ता ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत सर्व्हिस रोड करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती.

सोलापूर शहराला लागून अक्कलकोट, हैद्राबाद, तुळजापूर (धुळे), पुणे आणि विजयपूर असे पाच महामार्ग जातात. या पाचही महामार्गांना जोडणारा ६० मीटर रिंग रोड करण्याची गरज आहे. सोलापूरच्या बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या भाविक, पर्यटक तसेच सोलापूरकरांना रिंगरोडमुळे महामार्गावर जाणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे या रिंगरोडला मंजुरी द्यावी अशीही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन केली होती.

त्याचबरोबर शहरातून होणाऱ्या जडवाहतुकीमुळे होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी हैद्राबाद रस्त्यावरील तांदूळवाडी ते विजयपूर रस्त्यावरील हत्तूरपर्यंत चारपदरी बाह्यवळण रस्त्याची निर्मिती करावी. जेणेकरून सध्या हैद्राबादवरून होणारी जडवाहतुक सोलापूर शहरात न येता नव्याने होत असलेल्या सुरत – चेन्नई महामार्गावरील तांदूळवाडीपासून हत्तूरमार्गे विजयपूर रस्त्यावर जाईल. तर तुळजापूर रस्त्यावरील काटगाव ते पुणे महामार्गावरील बाळेपर्यंत चार पदरी बाह्यवळण रस्ता बनविल्यास सोलापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे या रस्त्यास मंजुरी द्यावी अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली होती.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात मागण्या मान्य करत सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी अनेक प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला.
———-
चौकट १

सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा शब्द करणार पूर्ण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सोलापूर शहरात उड्डाणपूल बांधण्याचा शब्द मी सोलापूरकरांना दिला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे काम राहिल्याचे शल्य माझ्या मनात आहे. बीएसएनएल, रेल्वे अशा केंद्रीय संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे काही अडचणी येत आहेत. परंतु याबाबत दिल्लीत येऊन माझ्याशी संपर्क करून ही कामे पूर्ण करून घ्या. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १०२० कोटी रुपये मंजूर करत असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
———
चौकट २

शहरातील डीपी रोड बाबत तोडगा काढण्याचा दिला शब्द

शहरातील डीपी रोडबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली असता याबाबत तोडगा काढण्याचा ठोस शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.
———–

कोट

सोलापूरच्या विकासाची वाढणार गती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचा आणि परिसराचा विकास वेगाने होत आहे. या विकासाचा वेग वाढविण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरात भुयारी मार्ग, बाह्यवळण रस्ते आणि भुयारी मार्गांची गरज आहे. याकरिता या विकासकामांची मागणी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागण्यांना त्वरित मंजुरी दिल्याचा आनंद आहे. हे भविष्यातील विकास प्रकल्प विकसित सोलापूरला बळ देणारे ठरणार आहेत. विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल सर्व सोलापूर जिल्हावासीयांच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार.
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button