सोलापुरात १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवजन्मोत्सवाचा भव्य सोहळा
डाळींबी आड मैदानात विविध क्रीडा, सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर
श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त दि. १३ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सोलापूर शहरातील डाळींबी आड मैदान, शिंदे चौक येथे भव्य शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व विश्वस्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सवाच्या कालावधीत युवकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी कबड्डी स्पर्धा, त्याच दिवशी खो-खो स्पर्धा होणार आहेत. दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धांमुळे युवकांमध्ये शिवचरित्राच्या विचारांची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
शिवजन्मोत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे दि. १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे होणारा पाळणा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी, शहिदांच्या कन्या तसेच विविध क्षेत्रातील विशेष गुणवंत महिलांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. हजारो महिलांच्या उपस्थितीत सामूहिक पाळणा गायनाचा हा भावनिक व प्रेरणादायी सोहळा होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका रात्रंदिवस परिश्रम घेत असून सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून चोख नियोजन करण्यात आले आहे.
या पाळणा कार्यक्रमासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, एमपीएससी उत्तीर्ण अमृता ननवरे, लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कु. वैष्णवी राम गायकवाड, एमपीएससी उत्तीर्ण संजीवनी व सरोजनी भोजने, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, तसेच वीर माता व वीर पत्नी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने वाहनांसाठी पारस इस्टेट, सुराणा मार्केट, अजंठा लॉज, हॉटेल अम्बॅसेडार ते प्रभाकर महाराज मंदिर रस्ता, तसेच बाजी अण्णा मठ ते पत्रा तालीम रस्ता येथे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलीस व स्वयंसेवकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीचा मुख्य सोहळा म्हणजे दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता निघणारी भव्य मिरवणूक होय. डाळींबी आड मैदानातून सुरू होणारी ही मिरवणूक सरस्वती बुक डेपो, नवी पेठ, मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म. गांधी रोड, बाळीवेस, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे पुन्हा डाळींबी आड मैदानात विसर्जित होणार आहे. मिरवणुकीत वारकरी भजनी मंडळे, लेझीम, झांज, ढोल पथक, शिवचरित्रावरील देखावे व लेझर शो सादर केले जाणार आहे.
यंदाच्या वर्षी मिरवणुकीत तीस ते पस्तीस मंडळांचा सहभाग असणार आहे
शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास, विचार व आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प असल्याचे मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष माजी उपमहापौर नाना काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, भाऊसाहेब रोडगे, सुनील रसाळे, प्रकाश ननवरे, लिंबराज जाधव, सचिन स्वामी, देविदास घुले, कृष्णा सुरवसे, सुजित चौगुले आदी उपस्थित होते.




