संघर्षातून विजयाकडे; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज…

सोलापूर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी सोलापूरचा दौरा केला. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आल्याने शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या दौऱ्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मंत्री दादा भुसे यांचे सोलापुरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. ही भेट आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
संघर्षमय परिस्थितीतही शिवसेनेच्या वतीने अमोल शिंदे, अनिकेत पिसे, प्रियदर्शन साठे या तिन्ही वाघांनी तसेच रणरागिणी मनोरमा सपाटे यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल मंत्री दादा भुसे यांनी विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. “संघर्षातून उभे राहिलेले हे नेतृत्वच शिवसेनेची खरी ताकद आहे,” असे स्पष्ट संकेत भुसे यांनी दिले.
या दौऱ्यादरम्यान मंत्री दादा भुसे यांनी शहर व जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना दिल्या. संघटन बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात शिवसेनेच्या हालचाली अधिक वेगवान झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून, आगामी निवडणुकीत शिवसेना आक्रमक भूमिकेत उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
याप्रसंगी माजी आमदार व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम साहेब, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योतीताई वाघमारे, मनीषजी काळजे, यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



