प्रभाग ६ मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार : पालकमंत्री गोरे…
भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून भेट !...

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –
प्रभाग ६ मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पालकमंत्री गोरे हे सोमवारी सायंकाळी प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर, सुनील खटके,सोनाली गायकवाड आणि मृणमयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते. पॅनल प्रमुख व भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून पालकमंत्री गोरे यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हौसिंग सोसायटीला भेट दिली. यावेळी रहिवाशांनी चाळीमधील अडचणी सांगत चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहत आहोत,कोणाचेही लक्ष नाही,आपण जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले.
पालकमंत्री गोरे यांनी रहिवाशांना जागेवरच शब्द दिला.प्रभाग सहा मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याचे त्यांनी गणेश वानकर यांच्या साक्षीने सर्वांना सांगितले. त्यानंतर रहिवाशांनी पालकमंत्री गोरे यांचा शब्द प्रमाण मानत सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याची ग्वाही दिली. कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणावे, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी मनोज पवार,श्रीनिवास नाईकवाडी,महेश चव्हाण,शिवानंद उद्धव,दत्तू उद्धव,स्वाती शितल, भानुदास कवडे,नासिर शेख,आबा नरळे आदी उपस्थित होते.



