अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : चौघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी…

सोलापूर
ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाली.
यातील साक्षीदार विश्वनाथ पारसवार याने आपले साक्षीत दिनांक ०७/०६/२०२१ रोजी तो त्याच्या दुकानात असताना ४० ते ४५ वर्षे वयोगटातील पुरुष रंगाने गोरा व अंगाने सशक्त हा येऊन दोन पन्नास किलो वजनाचे धान्य भरण्याचे पोत्याची मागणी केली, ती त्याने २६ रुपयास दिली. त्यावेळी त्या इसमाने त्यास ३० रुपये दिले होते, त्यापैकी ४ रुपये त्यास परत देण्याचे राहिले होते, त्यावेळी त्या इसमाने राहिलेले ४ रुपये तुझा बाप देणार का असे म्हणाला, ते ४ रुपये परत दिल्यावर तो इसम तेथून निघून गेला. त्यानंतर दि:- १७/०७/२०१९ रोजी ओळख परेड मध्ये त्याने आरोपी क्र. २ सुरेश चव्हाण यास ओळखले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
तदनंतरचा साक्षीदार नारायण कुरापाटी* याने आपले साक्षीत सहा. पोलीस आयुक्त यांनी पांडुरंग वस्ती येथील घर नं. २१६ याबाबतचे माहिती मागविली ती माहिती सोलापूर महानगरपालिके कडून सहा. पोलीस आयुक्त सोलापूर यांना जागे बद्दलची माहिती तसेच ती जागा महादेव लक्ष्मण खरटमल यांच्या नावे असल्याबाबतची माहिती पुरविल्याबाबतची महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
तिसरा साक्षीदार मतीनअहमद युसुफ शिकलगार याने आपल्या साक्षीत दि:- ७/६/२०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दोन इसम हे गाडीवरून त्याच्याकडे एक लोखंडी सत्तुर व लोखंडी कोयता यांस धार लावण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पैसे देण्याच्या कारणावरून हुज्जत घातली होती, त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाल्यावर ते पैसे देऊन निघून गेले. त्यानंतर दिनांक :- १७/७/२०१९ रोजी ओळख परेड मध्ये त्याने आरोपी क्र. १ बंटी खरटमल यास ओळखले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
चोथा साक्षीदार कुमार भिक्षापती रासकोंडा याने आपल्या साक्षीत त्याचे भारत हाउसिंग सोसायटीमध्ये लेटेस्ट हेअर सलूनचे दुकान चालवीत होतो, दि:- ८/६/२०१९ रोजी साधारण 12:30 च्या सुमारास पांडुरंग वस्ती कडून यातील आरोपी सुरेश चव्हाण हा गाडी चालवत होता व दुसरा आरोपी बंटी खरटमल हा त्याच्या पाठीमागे बसला होता, त्यावेळी आरोपी बंटीला हाक मारली परंतु ते तसेच निघून गेले, त्यानंतर दिनांक ९/६/२०१९ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास बंटी हा त्याच्या दुकानात येऊन संचार पेपर वाचत बसला होता, त्यावेळी त्यास काल दुपारी हाक मारली असता, तू का थांबला नाही, त्यावर आरोपी बंटी याने आरोपी चव्हाण वकिलाचे काम असल्यामुळे थांबलो नाही असे सांगितले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.
सदर खटल्यास पुढील तारीख १८/९/२०२५ ही तारीख नेमण्यात आली.
*या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे,आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.



