maharashtrapoliticalsocialsolapur

भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे अभिवचन : माणुसकी प्रतिष्ठान, सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा…

भटक्या विमुक्तांसाठीचा ४० हजार घरकुलांचा प्रकल्प नेणार पूर्णत्वास...

 

सोलापूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीनंतर भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी सेटलमेंट परिसरात उभारण्यात येणाऱ्या ४० हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, असे अभिवचन भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिले. माणुसकी प्रतिष्ठान, सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींतर्फे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मरगु मास्तर मैदानावर भव्य सभा झाली.

रविवारी सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. साईबाबा चौकातून मिरवणूकीस प्रारंभ झाला. फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मेरगु मास्तर मैदानावर पोहोचली. या ठिकाणी सभा झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, मुंबई येथील उद्योगपती काशिनाथ जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, राम गायकवाड, अमोल गायकवाड, शिवराज गायकवाड, शिवसेनेच्या उपशहर प्रमुख अनिता गवळी, मनीषा नलावडे आदी उपस्थित होते.

उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, काँग्रेसने आजवर भटक्या विमुक्त समाजाचा केवळ मतांसाठी वापर करून या समाजावर अन्याय केला. राज्यात भाजपा आणि महायुतीचे सरकार येताच सेटलमेंट परिसरातील घरकुलांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करू. त्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करण्यात येतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सोलापूरसाठी दुहेरी जलवाहिनी मंजूर केली आहे. या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी काही आठवड्यातच सोलापूर शहराला आठ दिवसांऐवजी एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. शहर मध्य विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एमआयएम सारख्या जातीयवादी विषारी पक्षाला रोखण्यासाठी सोलापूरकरांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही देवेंद्र कोठे यांनी यावेळी केले.

भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले, विकासाची तळमळ असलेले तरुण तडफदार उमेदवार म्हणून देवेंद्र कोठे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. सोलापूरकरांनी येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून देवेंद्र कोठे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहनही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी याप्रसंगी केले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार आणि भाजपा महायुती सरकारने आयुष्यमान भारत योजना, मोफत सिलेंडर, लाडकी बहीण योजना, मोफत धान्य अशा अनेक योजना राबविल्या आहेत. सोलापूरकरांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही मोहन डांगरे यांनी याप्रसंगी केले.

माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भारत जाधव म्हणाले, कैकाडी, पामलोर, छप्परबंद, पारधी, टकारी, गारुडी, मांग गारुडी अशा अनेक समाजासाठी काँग्रेस काळात वर्षानुवर्षे मागणी असूनही घरकुले मंजूर होत नव्हती. परंतु महायुती सरकार मध्ये प्रस्ताव दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. भटक्या विमुक्त जाती जमातींच्या विकासासाठी ४० हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्ण करणारच, असेही भारत जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी पवन गायकवाड, नागेश गायकवाड, राजू जाधव, ओम जाधव, शोभा गायकवाड, सुनंदा साळुंखे, मारता आसादे, जयश्री गायकवाड, शरणुबाई गायकवाड, अंबिका जाधव आदी उपस्थित होते.
—————–
चौकट
हजारो तरुणांच्या गर्दीने दिला ‘देवेंद्र कोठे आगे बढो’ चा नारा

‘जय श्रीराम’ चा गजर करीत जमलेल्या हजारो तरुणांच्या गर्दीने यावेळी ‘देवेंद्र कोठे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ चा नारा दिला. यावेळी तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button