केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह करणार सोलापुरातील वस्त्रोद्योगाची पाहणी : टेक्सटाईलसह रेडिमेड गारमेंट उद्योजकांचा घेणार मेळावा…

सोलापूर : प्रतिनिधी
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाची पाहणी करण्यासाठी लवकरच सोलापूरला भेट देणार असल्याचे सांगितले. वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी गिरीराज सिंह यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच सोलापुरात तयार होणाऱ्या मालाची निर्यात वाढण्यासाठी उपयुक्त उपाययोजनांबाबत चर्चा केली.
वस्त्रोद्योग क्षेत्राला न मिळणाऱ्या शासकीय सुविधा, उत्पादनातील अडचणी, चिनी मालामुळे भारतीय उत्पादकांच्या व्यवसायावर होणारे दुष्परिणाम अशा विविध समस्यांवर निवेदन देऊन भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी चर्चा केली. वस्त्रोद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच याबाबत मार्ग काढण्यासाठी आपण सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची पाहणी करावी आणि सोलापुरातील कारखानदार उद्योजक व्यापारी यांबाबत संवाद साधावा, अशी मागणीही श्री. दायमा यांनी याप्रसंगी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी याबाबत लवकरच सोलापुरात मेळावा घेऊन कारखानदार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.