दुष्कर्म केल्याप्रकरणी आश्रम संचालकास मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर:- ॲड.रितेश थोबडे…

सोलापूर
दि:- सोलापूर येथील महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी संजय नागनाथ जाधव वय:-42 रा.सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, पीडित महिला ही तिच्या मैत्रिणीच्या मुलीस अनाथ आश्रमात सोडविण्याकरता दोन वर्षांपूर्वी गेली होती, त्यावेळी तेथे आरोपी संजय जाधव याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ती तेथे अनाथ मुले दाखल करण्याचे काम करीत होते. त्यानंतर तिचे काम पाहून तिस संस्थेमध्ये नोकरी लावतो व ती घटस्फोटीत असल्याचे माहित असल्याने व आरोपीची पत्नी मयत असल्याने तिस लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केले व तिने लग्नाकरिता विचारणा केली असता, आरोपीने नकार दिला म्हणून तिने पोलीस आयुक्तालयात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यावर आरोपीने लग्न करतो व नोकरी लावतो अशी खात्री दिल्याने तिने तो अर्ज मागे घेतला, परंतु आरोपीने लग्न न केल्यामुळे दि:-27/7/2024 रोजी पीडितेने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यावर आरोपीने आपणास अटक होऊ नये म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर आरोपी संजयने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरिता अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता, घटना ही संमतीने झाली असल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी रक्कम रुपये 25000/-च्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
*यात अर्जदार/आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड.ऋतुराज आंबेकर यांनी काम पाहिले.*



