ईच्छा भगवंताची परिवाराकडून आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांचा सत्कार; श्री स्वामी समर्थ ग्रीन कॉरिडॉरमुळे स्वामी भक्तांना सुलभ दर्शन, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी
ग्रीन कॉरिडॉर हा केवळ विकास प्रकल्प नसून स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान आहे; धार्मिक पर्यटनाला चालना मिळून अक्कलकोटच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल - आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी

सोलापूर -
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमीचा सर्वांगीण विकास करून अक्कलकोटला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत मांडलेल्या ‘श्री स्वामी समर्थ ग्रीन कॉरिडॉर’ संकल्पनेला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५०० कोटींचा विकास आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिल्याने लाखो स्वामी भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा सोलापूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अक्कलकोट येथील संपर्क कार्यालयात आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, श्री स्वामी समर्थ ग्रीन कॉरिडॉर हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या श्रद्धेशी जोडलेला ऐतिहासिक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक दर्शन व्यवस्था उपलब्ध होईल. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पार्किंग, स्वच्छता, पायी चालणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग आणि अत्याधुनिक सुविधा यामुळे अक्कलकोटच्या धार्मिक वैभवात मोलाची भर पडणार आहे. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी स्वामी भक्तांच्या भावनांचा आदर राखत घेतलेला हा पुढाकार कायम स्मरणात राहील. सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी म्हणाले, श्री स्वामी समर्थ ग्रीन कॉरिडॉर हा केवळ बांधकामाचा प्रकल्प नाही, तर लाखो स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. या माध्यमातून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध दर्शन व्यवस्था उपलब्ध होईल. अक्कलकोटमध्ये धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
त्यामुळे हॉटेल व्यवसाय, व्यापारी, वाहनचालक, लघुउद्योजक आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. श्रीक्षेत्र अक्कलकोटचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी कोणताही विलंब न करता त्यास मंजुरी देऊन प्रकल्पाला गती दिली. यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच ईच्छा भगवंताची परिवाराने माझा केलेला सन्मान हा माझ्यावरील प्रेमाचा आणि स्वामी भक्तांच्या आशीर्वादाचा स्वीकार असून, संपूर्ण परिवाराचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतन नागेश अण्णा गायकवाड, हुलगप्पा शासम, महादेव राठोड, पाटील, यल्लाप्पा शिवपुरे यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी हा प्रकल्प अक्कलकोटच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



