आरोपीची जामीनावर मुक्तता खटल्याची जलद चौकशी हा आरोपीचा मूलभूत अधिकार: मुंबई उच्च न्यायालय…

सोलापूर:-
दशरथ नारायणकर याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याप्रकरणी बाबासाहेब जालिंदर बाळशंकर यांस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, मयत दशरथ याची पत्नी अरुणा हिचे बाबासाहेब बाळशंकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. दि:- 21/9/2022 रोजी अरुणा व तिची मुलगी रात्री 11:30 च्या सुमारास झोपी गेले होते, त्यावेळी अरुणा हिस मोठा आवाज आला असता, ती पाहण्यासाठी गेली असता तिचा पती दशरथ हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, तिने आरडा ओरडा केला असता, तो मारणारा इसम तेथून पळून गेला अशा आशयाची फिर्याद प्रथम मयताची पत्नी अरुणा हिने एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली होती. तपासाअंती आरोपी बाबासाहेब व मयताची पत्नी अरुणा यांच्यात संबंध असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी मयताच्या पत्नीस देखील आरोपी केले होते. दि:-17/12/2022 रोजी पोलिसांनी तपास करून दोघांविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
त्यावर आरोपी बाबासाहेब याने आपणास जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर आरोपी बाबासाहेब याने ऍड.रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात, खटला हा अद्याप सुरू झालेला नाही, भारताच्या संविधाना प्रमाणे जलद खटला चालणे हा आरोपीचा मूलभूत अधिकार असून खटला चालण्यास बराचसा अवधी लागणार असल्याने आरोपीस जामीन देण्यात यावा,असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 1,00,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार/आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे पी.पी.भोसले यांनी काम पाहिले.