सुविधांपासून वंचित ठेवलेल्यांना खड्या सारखे बाजूला काढा निलम नगरच्या पदयात्रेत काडादींनी दिली हाक…
सोलापूर,
दि. 16- गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही निवडून दिलेले आणि तुम्हाला मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित ठेवलेले लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकले का, अशांना तुम्ही निवडून देणार का, असा सवाल करुन अशा लोकप्रतिनिधीला खड्यासारखे बाजूला काढा असे आवाहन करून या निवडणुकीत मला साथ आणि आर्शीवाद देऊन संधी द्या.या संधीचे आपण सोने करु आणि या मतदारसंघाचा विकास घडवून आणू, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दिली.
शनिवारी, नीलमनगर भागात आयोजित केलेल्या पदयात्रे दरम्यान काडादी बोलत होते. या पदयात्रेत ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, ज्येष्ठ नेते सुरेश फलमारी, प्रा. अशोक निंबर्गी, सुरेश झळकी, उत्तम पाटील, प्रा. धर्मराज हंद्राळ, सामाजिक कार्यकर्ते बसवराज उडचाण, मनोहर माचर्ला, बालाजी कोंडी, प्रसाद कदम, सुनील बळी, विनायक म्हेत्रे, संदीप म्हेत्रे, दरेप्पा म्हेत्रे, अशोक बिराजदार, लक्ष्मण झळकी, आप्पासाहेब माळी, श्रीकांत नवले, रवींद्र साखरे, केदार म्हेत्रे, श्रीकांत घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी काडादी यांचे फटाक्यांची आतषबाजी करत महिला मंडळींच्यावतीने औक्षण करुन जोरदार स्वागत करण्यात आले.
अॅड. थोबडे म्हणाले, यापुढे विकास पाहिजे असेल धर्मराज काडादी हे एकमेव नेतृत्व असून मतदारांनी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. पदयात्रेदरम्यान, ‘काडादी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या व अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी मधुकर कोक्कूल, विजयकुमार हुंडेकरी, श्रीशैल आलदीप, संदीप म्हेत्रे, मनोज आडम यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभाग नोंदवून कॉम्प्युटर चिन्हावर बटण दाबून काडादी यांनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
चौकट
ही लढाई मोठी आहे: काडादी
नीलम नगर भागात आयोजित पदयात्रेवेळी नागरिकांना संबोधित करताना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी म्हणाले, ही लढाई मोठी आहे. माझ्या एकट्याची ही लढाई नाही, मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. त्यामुळे या भागातील मूलभूत सोयी-सुविधांसह तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करु. तुमचा आर्थिकस्तर उंचावू. परंतु, त्यासाठी तुम्ही एकजुटीने काम करुन आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहनही काडादी यांनी केले.