india- worldmaharashtrapoliticalsocial

रेशनच्या तांदळात मृत साप 24 तास उलटले तरी नोटीसीला उत्तर नाही मोदीतील दुकानदारावरील कारवाईकडे लक्ष….

प्रतिनिधी
सोलापूर, दि. 13-

 

मोदी परिसरातील ड-25 या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता. यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये, याबाबत 24 तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बजावली होती. परंतु दोषी दुकानदाराने 24 तास उलटले तरी अद्याप नोटीसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे आता अन्नधान्य वितरण अधिकारी दोषी दुकानदारावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
तांदळात मृत साप आढळूनही गाफिल राहिलेले रेशन दुकानदार आता नोटीसीला उत्तर देण्यातही हलगर्जीपणा दाखवित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

रेशनच्या तांदळात मृत सापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार अन्नधान्य वितरण अधिकार्‍यांनी तत्काळ पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी व त्या तांदळाचे नमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठवून देण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशीही संबंधित दुकानातील धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा करून ग्राहकांसाठी दर्शनी भागात असलेल्या काचेच्या भरणीत त्याचे नमुने ठेवावे लागतात.

 

 

 

पण तसे न करता संबंधित दुकानदाराने नियमाकडे डोळेझाक करून निष्काळजीपणे धान्य वाटप केल्याचे दिसून येते. याची गंभीर दखल घेत अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांनी संबंधित दुकानदारास नोटीस बजावली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यापासून संबंधित दुकानदार पळवाट शोधत असल्याची चर्चा मोदी भागात सुरू आहे. दुसरीकडे अन्नधान्य वितरण अधिकार्‍यांकडून कारवाई अटळ असल्याचेही बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button