
यात हकीकत अशी की,
लोकसेवक हरिभाऊ खाडे, पोलीस निरीक्षक (वर्ग-1), आर्थिक गुन्हे शाखा, बीड व इतर दोघांना लाच प्रकरणी अटक करण्यात येऊन त्या सर्वांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकसेवक हरिभाऊ खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वर्ग-1) यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घरझडती घेण्यात आली होती. सदर घर झडतीवेळी त्यांच्या घरात रोख रक्कम रु. 1,086,6620/- , सोन्याचे दागिने व बिस्किट असे मिळून 972.95 ग्रॅम, चांदीचे दागिने व वस्तू असे मिळून 5623.50 ग्रॅम तसेच अचल संपत्ती दस्त व मौल्यवान दस्तानची किंमत व घरातील साहित्यांची किंमत असे एकूण रक्कम रु. 2,70,81,507/- मिळून आलेले होते.
त्यासंदर्भात बीड लाचलुचपत विभागाने लोकसेवक खाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, (वर्ग-1) यांच्या जंगम व स्थावर मिळकतीच्या संदर्भात उघड चौकशी सुरू केली होती. सदर उघड चौकशी दरम्यान लोकसेवक खाडे यांनी त्यांचे उत्पन्नाचे कायदेशीर स्त्रोतांची माहिती दिली नाही, म्हणून त्यांच्या व त्यांची पत्नी मनीषा खाडे विरुद्ध तत्कालीन पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, बीड यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली होती.
सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक हरिभाऊ खाडे यांची पत्नी मनीषा खाडे यांनी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने बीड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सदरचा अर्ज बीड येथील मे. न्यायालयाने फेटाळलेला होता.
त्यामुळे त्यांनी मा. ना. उच्च न्यायालय, संभाजीनगर येथे ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाच्या चौकशीवेळी ॲड. निलेश जोशी, सोलापूर, यांनी प्रस्तुत प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केला असल्याचे, तसेच आलोसेच्या पत्नी मनीषा खाडे यांच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील प्रत्येक वर्षी आयकर विभागास कळवून त्यावर टॅक्स देखील भरला असल्याचे निदर्शनास आणून दिले .
तसेच त्यांच्या नावे असलेली मिळकत ही त्यांची स्वकष्टार्जित व कायदेशीर उत्पन्नाच्या स्त्रोतांतून घेतली असल्याचे कागदपत्राच्या आधारे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांना प्रस्तुत प्रकरणात खोटेपणाने गुंतवले असल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यापृष्ठार्थ मा. ना. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते. आरोपी मनीषा खाडे याच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायमूर्ती श्री. निरज पी. धोटेसाहेब यांनी आरोपी मनिषा खाडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे.
सदर प्रकरणात आरोपी मनीषा खाडे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. विजय लटंगे यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. एस. के. शिरसे यांनी काम पाहिले.



