बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी सोलापुरातील डॉक्टर पती-पत्नीची निर्दोष मुक्तता – न्यायाधीश संदीप नवले यांचा महत्वपूर्ण निकाल

सोलापूर
बाळे येथील आरोही मॅटर्नीटी व जनरल हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशीन ठेवून रुग्णांचे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी सोलापुरातील डॉ. प्रशांत पांडुरंग इंगळे आणि डॉ. अपर्णा प्रशांत इंगळे या डॉक्टर पती-पत्नीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. संदीप नवले यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. महाराष्ट्रातील पूर्व गर्भधारण आणि प्रसूतीपूर्व निदान करणारे कौशल्य (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा – १९९४ च्या कायाद्यान्वये प्रलंबीत असणाऱ्या केवळ पाच ते सहा खटल्यामधील या खटल्याचा निकाल न्यायालयीन क्षेत्रात अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
याची हकीगत अशी की, सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी त्यांच्या सहकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना कोरे, डॉ. वैशाली शिरशेट्टी, डॉ. शोभा पुजारी व अन्य स्टाफसह दि. २४/०६/२०१५ रोजी डॉ. इंगळे यांच्या आरोही हॉस्पिटलवर छापा घालून तपासणी केली असता तेथे त्यांना सोनोग्राफी मशीन, फाईल वगैरे आढळून आले. तेथे अॅडमिट असणाऱ्या रुग्णांनी इंगळे डॉक्टर हेच सोनोग्राफी मशीन हाताळून त्यांच्या तपासण्या करीत असल्याचे सांगितले. डॉ. इंगळेसह परिचारिका या देखील त्यांना दवाखान्यात दिसून आल्या. डॉ. इंगळे यांना सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी शिक्षण व अधिकारही नव्हते. तसेच त्याकरिता कायाद्यानुसार आवश्यक कागदपत्रे ठेवली नव्हती व सोनोग्राफी मशीनची नोंदणीही म.न.पा. आरोग्य खात्यात केली नव्हती. त्यामुळे डॉ. इंगळे पती-पत्नीनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता गैरमार्गाने व गुपचूप सोनोग्राफी मशीनचा गर्भलिंग निदान करण्याकरिता गैरवापर करून गुन्हा केल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती संजीव आडके यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले.
प्रस्तुत खटला दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार डॉ. जयंती आडके यांना नाही, तथाकथित छापा घालण्यात आलेले हॉस्पिटल तसेच सोनोग्राफी मशीन, फाईल वगैरेंशी आरोपींचा संबंध नाही, परिचारिका, पेशंट या काल्पनिक व्यक्ती असून त्यांचा आरोपींशी संबंध नाही, असे विविध मुद्दे डॉ. प्रशांत इंगळे यांचे वकील अरविंद अंदोरे यांनी न्यायालयासमोर वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाड्यांसह मांडून आरोपींविरुद्ध साक्ष देणारे म.न.पा. चे डॉक्टर्स संगनमताने खोटी कागदपत्रे बनवून आरोपींविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा युक्तिवाद केला. तर डॉ. अपर्णा इंगळे यांचे वकील शशी कुलकर्णी यांनी आरोपींविरुद्धचा खटला बेकायदेशीर असून कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात गाजलेल्या या खटल्यात आरोपी नं.१ तर्फे अॅड. अरविंद अंदोरे, अॅड. आल्हाद अंदोरे, अॅड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले. आरोपी नं.२ तर्फे अॅड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर फिर्यादी तर्फे (सरकारी वकील) अॅड. शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले.



