मा. ना. उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंचने लाच प्रकरणातील आरोपींना केले दोषमुक्त:-ॲड. निलेश जोशी…

सोलापूर
यात हकीकत अशी की,
शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित माध्यमिक आश्रम शाळा येडाव-खवे ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे शाळेचे मुख्याध्यापक विश्वंभर काळे व लिपिक सचिन कांबळे यांनी दोन पोती धान्य व रक्कम रु. १,०००/- लाचेची मागणी केली, म्हणून तक्रारदाराने त्यांच्याविरुद्ध सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केलेली होती.
त्यानुसार सोलापूर लाचलुचपत विभागामार्फत दि. ०५/०७/२०१८ रोजी तक्रारदाराच्या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक काळे यांनी दोन पोती गहू व लिपिक सचिन कांबळे यांनी रक्कम रु. १,०००/- ची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींविरुद्ध पुढील सापळा कारवाई करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे मंगळवेढा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणात आरोपी विश्वंभर काळे व सचिन कांबळे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज करून मे. न्यायालयास गुन्हाची दखल घेता येणार नाही, असा अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
सदर आदेशाविरुद्ध आरोपी विश्वंभर काळे व सचिन कांबळे यांनी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने कोल्हापूर येथील मा. ना. उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच येथे रिव्हीजन अर्ज दाखल केला.
आरोपीच्यावतीने असे मुद्दे मांडण्यात आले की, आरोपींविरुद्ध अभियोग दाखल करण्यास देण्यात आलेली परवानगी ही देण्याचा सक्षम अधिकाऱ्यास अधिकार नसल्याने आरोपींविरुद्ध दाखल खटल्याची मे. न्यायालयास दखल घेता येत नाही, असा युक्तिवाद करून त्यापृष्ठर्थ मा. ना. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले दिलेले होते.
ॲड. निलेश जोशी, सोलापूर यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून मा. न्यायमूर्ती श्रीमती. शर्मिला देशमुख सोl यांनी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यातून त्यांना दोषमुक्त केले.
सदर प्रकरणात मुख्याध्यापक विश्वंभर काळे व लिपिक सचिन कांबळे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी यांनी काम पाहिले.



