उमाकांत मिटकर : श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे उमाकांत मिटकरी आणि ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांचा सन्मान..
धार्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तींमुळे धर्माचा विजय..

सोलापूर : प्रतिनिधी
धार्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तींमुळे धर्माचा विजय होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी केले. श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर आणि जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांचा सन्मान करण्यात आला.
मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र स्वाहाकाराचे दर्शन श्री. मिटकर आणि ॲड. राजपूत यांनी मंगळवारी घेतले. यावेळी रुद्रयंत्र, नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ, शाल आणि पुष्पहार घालून दोघांचा मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विशाल बन्सल, मुंबई येथील उद्योजक आणि स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, कृष्णात पाटील उपस्थित होते.
श्री. मिटकर म्हणाले, समाजातील सज्जनशक्ती एकत्र करण्याचे काम श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. हिंदू धर्म उत्थानाच्या आणि देशसेवेच्या कार्यात भक्त म्हणून मी कायम सहभागी राहीन. ॲड. राजपूत म्हणाले, देव, देश, धर्माचे काम मठातर्फे अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहे. या कार्यात सहभागी होणे आणि आपली सेवा रुजू करणे हे प्रत्येक नागरिकाचे परमकर्तव्य आहे. मठाच्या सेवेसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील, असेही जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी सांगितले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गिरीश गोसकी यांनी केले. कृष्णात पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.