खोट्या विमर्शा विरोधातील वैचारिक लढाई ही काळाची गरज…
गितेश चव्हाण : अभाविपच्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप...

सोलापूर : प्रतिनिधी
खोटे विमर्श बनवून विद्यार्थी वर्गासह भारतीयांची दिशाभूल करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशा खोट्या विमर्शाविरोधातील तरुण विद्यार्थ्यांची वैचारिक लढाई ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण यांनी केले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप बुधवारी थाटात झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी होते.
क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण म्हणाले, ज्ञानाचा दिवा पेटला की अज्ञान शिल्लक राहणार नाही. जीवनमूल्यांबद्दल आपण सजग असले पाहिजे. ज्यांच्या जीवन चरित्रातून जीवनमूल्यांचे प्रकटीकरण होते, अशा महापुरुषांची चरित्रे महाविद्यालय तरुण-तरुणी पर्यंत पोहोचवली पाहिजेत. सकारात्मक विमर्श प्रस्थापित करण्यात महाविद्यालय परिसराची भूमिका महत्त्वाची आहे, असेही क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण यांनी सांगितले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेश संघटनमंत्री मीत ठक्कर यांनीही विविध जिल्ह्यातून अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बुधवारी समारोपाच्या दिवशी जिल्हाश: बैठका, आगामी दिशा, व्यवस्था परिचय, घोषणा सत्र अशी अनेक सत्रे झाली. प्रदेश कार्यकारिणी बैठकीने अधिवेशनाचा समारोप झाला.
————
चौकट
अभाविपचे काम सर्वव्यापी सर्वस्पर्शी
भाषण सत्रात राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम हे सर्वव्यापी सर्वस्पर्शी काम आहे. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्यापणारे सर्व घटकांच्या उन्नतीचा विचार करणारे कार्य अनेक दशकांपासून अभाविप करत आहे. आगामी काळातही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हीच प्रेरणा ऊराशी घेऊन वाटचाल करावी.