बनावट बांधकाम फसवणूक प्रकरण- महापालिका सहा.अभियंता शिवशंकर घाटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन:- ॲड. प्रशांत नवगिरे…

सोलापूर- येथील शिवशंकर बळवंत घाटे वय- 56 वर्षे, धंदा- सहा. अभियंता सोमपा, रा. 27, रेवणसिद्धेश्वर मंदिर जवळ, सोलापूर यांनी व इतर तिघांनी मिळून अधिकार नसताना बनावट बांधकाम परवाने मंजूर करून महापालिकेची 2,42,408/- रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी त्यास मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. एस. खुने साहेब यांनी अंतरिम अटकपूर्व जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश पारित केला.
यात हकीकत अशी की,
उपअभियंता, अर्जदारासह अन्य एक सहा. अभियंता व कनिष्ठ लिपिक या चौघांनी संगनमत करून त्यांना अधिकार नसताना बनावट बांधकाम परवाने दिले, तसेच आवक रजिस्टर व अधिकृत बांधकाम परवाना क्रं. १ ते ९६ दस्त गायब केला, महापालिकेकडे कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून चौघांनी संगनमत करून महापालिकेचे 2,42,408/- रुपयांचे आर्थिक नुकसान केले अशा आशयाची फिर्याद उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी सदर बझार पोलिसात अर्जदार व इतर तिघांविरुद्ध दाखल केली. त्यामध्ये अर्जदाराने एकूण सहा प्रकरणे अधिकार नसताना मंजूर केल्याचा आरोप अर्जदार यांच्यावर ठेवण्यात आला. तद्नंतर अटकेच्या भीतीपोटी सहा. अभियंता शिवशंकर घाटे यांनी ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरिता धाव घेतली. सदरकामी अर्जदारातर्फे आजरोजी अंतरिम अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद करण्यात आला. अर्जदार निर्दोष असल्याबाबत युक्तिवाद करून संबंधित कागदपत्रे न्यायालयाचे निदर्शनास आणली. अर्जदाराचे वकिलांचा युक्तिवाद ऐकून मा. न्यायालयाने अर्जदाराने महापालिका आवारात प्रवेश करू नये, कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांना भेटू नये या अटींसह अर्जदाराचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात सरकार पक्षाचे म्हणणे येणेकरीता दि. 03/09/2024 अशी तारीख नेमलेली आहे.
यात अर्जदारातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. गणेश माशाळ, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिध्दाराम पाटील हे काम पाहत आहेत.