दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांसाठी श्रीकांत शिंदे यांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द…

मुंबई :
राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून, या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
आज देवगिरी निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.
राज्यातील शेतकरी नैसर्गिक परिस्थितीमुळे विविध अडचणींचा सामना करीत आहेत. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीतून योगदान देणे आवश्यक आहे. याच भावनेतून श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत देत सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शेती आणि शेतकरी कुटुंबांवर होत असल्याने त्यांना शासनाच्या मदतीसोबतच समाजातील विविध घटकांनीही आपल्या परीने हातभार लावणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संकटग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
शेतकरी बांधवांना या कठीण काळात दिलासा मिळावा, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात आणि आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेत मदतीसाठी योगदान देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असून, संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली…



