महारथोत्सव अन पालखीसेवेने श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाची सांगता
'हरि सर्वोत्तमा, वायु जिवोत्तमा' चा झाला गजर : भाविकांची तुडुंब गर्दी

सोलापूर : प्रतिनिधी
महारथोत्सव अन पालखीसेवेने श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. उत्तराराधनेनिमित्त सोमवारी शहरातील दोन्ही मठांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले.
सोलापुरात होणाऱ्या आराधना महोत्सवाचे यंदाचे ५२ वे वर्ष होते. मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये हा आराधना महोत्सव झाला.
जगदगुरु श्री मन्ममध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्ष होणाऱ्या श्री राघवेंद्रस्वामी आराधना महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिमदिवशी सोमवारी मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात आणि श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील श्री राघवेंद्र स्वामी मठात पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी ११ वाजता तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थप्रसाद हे कार्यक्रम झाले. मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात सकाळी प्रवचन आणि भजनही झाले.

यानंतर दुपारी १ वाजता मुरारजी पेठेतील श्री राघवेंद्र नगरातून महारथोत्सव झाला. रंगबेरंगी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात मूर्ती ठेवण्यात आली होती. रथ मिरवणुकीच्या अग्रभागी फुलांनी सजवलेल्या गाडीत श्री राघवेंद्र स्वामींची प्रतिमा होती. रथ मिरवणुकीत महिला भाविकांनी टिपरीच्या तालावर विविध भक्तीगीते नृत्यासह सादर केली. तसेच पुरुष भाविकांनीही विविध भक्ती गीतांवर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढविला.
श्री राघवेंद्र नगरातून निघालेल्या या रथ मिरवणूकीचे नागरिकांनी स्वागत केले. तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठात पालखीसेवा करण्यात आली. दोन्ही मठातील धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


