वैभव वाघे खून खटला ! अँड. संतोष न्हावकर यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती जाहीर…

सोलापूर
माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड मुख्य आरोपी असलेल्या वैभव वाघे खून खटल्यात पोलीस आयुक्तालय सोलापूर यांचेकडून अँड. संतोष न्हावकर यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती व्हावी असा शासनाकडे गेलेला प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केला असून एकूण सात आरोपी असलेल्या खून खटल्यात विशेष सरकारी वकीलपदी अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे परिपत्रक विधी व न्याय खात्याने आज जारी केले आहे. विशेषतः जिल्हा सरकारी वकील प्रदिप रजपूतनी हा खटला जनहिताचा व संवेदनशील नसल्याचे सांगत आणि जिल्हा सरकारी वकील सक्षम असल्याचे सांगत नेमणुकीस विरोध दर्शविणारा अहवाल शासनाकडे पाठवलेला होता. परंतु तो अहवाल फेटाळून शासनाने अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती जाहीर केली.
सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड व इतर 7 आरोपींविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे सदर गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून या गाजलेल्या खटल्यात गुन्ह्यात महाराष्ट्र शासनाने अँड. संतोष न्हावकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला व नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली, त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली व त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्याचे हाता पायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली.
अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला असल्याची फिर्याद सीमा विलास गायकवाड यांनी दाखल केली आहे.
सिद्धार्थ सोसायटीतील रहिवाशांनी तसेच मुळफिर्यादी व नेत्र साक्षीदार यांनी प्रस्तुत गुन्हा हा अतिसंवेदनशील असल्याने व आरोपींनी कट रचून वैभव वाघे याचा खून व सहा ते सात नेत्र साक्षीदार यांना लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुषपणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने व त्यांना प्रस्तुत गुन्ह्यात न्याय मिळावा म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून अँड. संतोष विठ्ठलराव न्हावकर यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी केलेली होती.


