india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्षाबंधनानिमित्त बांधली राखी; भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला भावनिक उजाळा

 

मुंबई : प्रतिनिधी

रक्षाबंधनाचा पवित्र सण म्हणजे केवळ मनगटावर बांधला जाणारा राखीचा धागा नव्हे, तर भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या अतूट नात्याची जपणूक करणारा दिवस. याच भावनेतून शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी रक्षाबंधनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याला भावनिक उजाळा दिला शिवसेनेत प्रवेश केल्यापासून दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी डॉ. वाघमारे या एकनाथ शिंदे यांना राखी बांधतात. यावेळीही त्यांनी अत्यंत आपुलकीने राखी बांधत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे साहेबांनी मला सख्ख्या बहिणीप्रमाणे प्रेम आणि मान दिला. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संसदेत काम करण्याची संधी दिली राज्यसभेची खासदार झाल्याचा आनंद मोठा होता मात्र शिंदे साहेबांना राखी बांधताना मिळणारा आनंद त्याहूनही मोठा आहे, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.

 

 

 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण, ‘लेक लाडकी’ योजना, सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय तसेच एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांच्या आत्मविश्वासाला बळ मिळाल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एकनाथ शिंदे हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर त्यांचे लाडके भाऊ आहेत महिलांच्या आयुष्यात सन्मान, आधार आणि स्वावलंबन निर्माण करणाऱ्या या लाडक्या भावाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची खरी ओवाळणी ठरेल, असा विश्वास डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button