खुनी हल्ला प्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता:- ॲड. शशी कुलकर्णी

सोलापुरः –
“मिटींगला का आला नाही”, म्हणून सत्तुरने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणीच्या खटल्यात माजी नगरसेवक बुध्दवासी प्रविण निकाळजे यांचे कार्यकर्ते १) सुनिल साबळे वय ४६ वर्षे, २) जकरिया सय्यद वय २८ वर्षे, ३) श्रीधर काटकर वय ३१ वर्षे, ४) तुषार बनसोडे वय २४ वर्षे, ५) नागसेन गायकवाड वय- ४० वर्षे, ६) सागर गायकवाड वय ३३ वर्षे सर्व रा. कुमठा नाका, सोलापुर या ६ कार्यकर्त्यांची सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
याची हकीकत की, दि. १६/०२/२०२० रोजी फिर्यादी संजय कुचेकर यास सुनील साबळे याने “मिटींगला का आला नाही,” म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर माजी नगरसेवक प्रविण निकाळजे यांनी वरील सर्व आरोपीचा बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी संजय, त्याचे भाऊ ज्योतीपाल, विजय यांच्यावर खुनी हल्ला करून, सत्तुरने वार करून गंभीरपणे जखमी केले, अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास होऊन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान सदरचा खटला अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर असताना, दि. २३/०५/२०२६ रोजी मुख्य आरोपी माजी नगरसेवक प्रविण निकाळजे यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्याविरुध्दचा खटला अबेट (रद्द) झाला.
सदर खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन, त्यामध्ये सरकार पक्षाने एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी-साक्षीदार, पंच, डॉक्टर, पोलीस अधिकारी इत्त्यादीच्या महत्त्वपुर्ण साक्षी झाल्या. सरकार पक्षाने जखमी-साक्षीदार, पंच,डॉक्टर यांच्या साक्षीतून आरोपीवरचा गुन्हा सिध्द होत असल्याने, सर्व आरोपींना दोषी धरून त्यांना कठोर शिक्षा करावी, असा युक्तिवाद केला. त्याउलट आरोपीच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, आरोपी विरूध्द कोणताही गुन्हा सिध्द होत नाही, साक्षीदाराच्या साक्षी मध्ये प्रचंड विसंगती आहे, अज्ञात व्यक्तीने हल्ला केला, अशी सुरूवातीची माहिती हॉस्पिटल व पोलीस स्टेशनला मिळालेली आहे, आरोपी कार्यकर्त्यांना गुंतवण्यासाठी म्हणून सदरचा खटला दाखल केला आहे, त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करावे, असा युक्तिवाद केला.
सदरचा दोन्ही बाजुचा युक्तिवाद विचारात घेऊन, न्यायालयाने प्रकरणातील इतर आरोपी म्हणजे प्रविण निकाळजे यांचे वरील एकूण ६ कार्यकर्ते म्हणजेच वर नमूद सर्व सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपी जकरीया सय्यद व श्रीधर काटकर तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, आरोपी सुनिल साबळे वगैरे तर्फे अॅड. इस्माईल शेख, आरोपी नागसेन गायकवाड तर्फे अॅड. विद्यावंत पांढरे, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड. सिराज शेख यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदिपसिंह रजपूत, अॅड. आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले.



